Vikhe Patil : मागच्या 12 वर्षात माझा काकांशी आणि चुलत भावाशी… नीला विखे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल मोठा खुलासा
Nila Vikhe Patil On Radhakrishna Vikhe Patil : नीला विखे पाटील स्वीडन देशात खासदार झाल्या आहेत. त्यादरम्यान त्यांच्यावर काैतुकाचा वर्षाव होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नीला विखेंचे काैतुक केले. यादरम्यानच नीला विखे यांनी आता मोठा खुलासा केला.

राज्यातील बडे राजकीय घराणे, साखर कारखाने आणि शैक्षणिक क्षेत्रात विखे पाटील कुटुंब आघाडीवर आहे. अहिल्यानगरमधील विखे पाटील घराण्यातील लेक नीला विखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेतली. नीला विखे पाटील 41 व्या वर्षी स्वीडन देशात खासदार झाल्या. 349 सदस्य असलेल्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी नुकतीच निवडणूक जिंकली आणि त्या स्वीडनमध्ये खासदार झाल्या. ज्यानंतर त्यांच्या नावाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगताना दिसली. यादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर काैतुक करत भाष्य केले. नीला विखे या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची नात आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या नीला या कन्या आहेत. मात्र, त्यांनी नुकताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल मोठा खुलासा केला.
नीला विखे पाटील पीटीआयशी बोलताना म्हणाल्या की, कोणीतरी मला एक व्हिडीओ पाठवला आहे. ज्यात सुजय विखे पाटील असे म्हणताना दिसत आहे की, महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला. असो विखे पाटील कुटुंबातील एक सदस्य स्वीडनमध्ये खासदार झाला आहे.. मला खरोखरच हे ऐकून धक्का नक्कीच बसला. मागील 10 ते 12 वर्षात माझा काकांशी आणि चुलत भावाशी कोणताही दुरपर्यंत संबंध नाही.
आमच्या साधे बोलणेही होत नाही. मी भारतात कायमच येते. माझी .ये-जा सुरूच असते. पण मी त्यांना कधीही भेटले नाही. मी एकडे स्वीडनमध्ये निवडून आल्यानंतर माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात म्हणजे त्यांचे आणि माझे राजकारण पूर्णपणे वेगळे आहे, आमची विचारसणी वेगळी आहे. मी ज्या पक्षाशी बांधील आहे तो पक्ष मी कधीच सोडणार नाही, त्यांनी वारंवार आपली पक्ष बदलली आहेत.
त्यांनी थेट आपल्या काकाच्या सततच्या पक्ष बदल्याच्या राजकारणावर बोट ठेवले. नीला यांनी पुढे म्हटले की, मी खासदार झाल्यानंतर काकांनी मला फोन केला, त्यांनी माझे अभिनंदन केले. नक्कीच ते चांगले होते. पण मी स्पष्ट करू इच्छिते की, त्या पलिकडे आमच्यात कोणत्याही प्रकारचे काैटुंबिक आणि राजकीय संबंध नाहीत. नीला स्वीडनमध्ये खासदार झाल्यानंतर विखे पाटील बोलताना दिसले होते.