New Zealand social media ban : सरकार घेणार मोठा निर्णय, 16 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन

सोशल मीडियाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आलं आहे, हे विधेयक मंजूर झाल्यास 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाहीये.

New Zealand social media ban : सरकार घेणार मोठा निर्णय, 16 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2025 | 4:20 PM

न्यूझीलंडच्या संसदेमध्ये असं एक विधेयक सादर केलं गेलं आहे, ज्यामध्ये 16 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घालण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांकडून याबाबत गुरुवारी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तरुण वर्ग सोशल मीडियापासून दूर राहवा, ऑनलाईन फसवणुकीपासून त्यांची सुरक्षा व्हावी या उद्देशानं हे विधेयक न्यूझीलंडच्या संसदेमध्ये सादर करण्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षाचे खासदार कॅथरीन वेड यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. नवं विधेयक मंजूर होऊन त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये कोणालाही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं खातं ओपन करायचं असेल तर सर्वात प्रथम त्यांना एज व्हिरीफिकेशनसाठी आपल्या वयाचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

दरम्यान न्यूझीलंडपूर्वी ऑस्ट्रेलियात देखील अशाच प्रकारचा एक कायदा 2024 मध्ये बनवण्यत आला आहे, ज्यामध्ये 16 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे, कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यापूर्वी एज व्हिरीफिकेशन सक्तीचं करण्यात आलं आहे, त्यानंतर आता न्यूझीलंडमध्ये देखील असाच एक कायदा लवकरच तयार करण्यात येणार आहे, नव्या कायद्यानुसार 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया बॅन करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांवर सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तेथील सरकार लवकरच हा निर्णय घेणार आहे.

दरम्यान संसदेमध्ये हे विधेयक सादर करण्यात आलं आहे, या विधेयकाला सत्ताधारी पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला आहे, मात्र दुसरीकडे विरोधी पक्षानं या विधेयकाला विरोध केला आहे, त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. न्यूझीलंड पूर्वी ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि नॉर्वे सारख्या देशांमध्ये या संदर्भात कायदा तयार करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या प्रभावापासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी आता जगातील अनेक देशांमध्ये अशाप्रकारचा कायदा तयार करण्यात येत आहे. मात्र हा कायदा तयार झाल्यानंतर त्याचा कितपत फायदा होणार? हा देखील एक मोठा प्रश्नच आहे.