Nigeria church attack : नायजेरीयातील चर्चमध्ये रक्तपात! सामूहिक प्राथनेवेळी माथेफिरुंचा हल्ला, महिला-लहान मुलांसह 50 ठार

Owo attack News : नायजेरीयात झालेल्या हल्ल्यात 50 जण ठार झालेत.

Nigeria church attack : नायजेरीयातील चर्चमध्ये रक्तपात! सामूहिक प्राथनेवेळी माथेफिरुंचा हल्ला, महिला-लहान मुलांसह 50 ठार
चर्चवर हल्ला, 50 ठार
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 06, 2022 | 6:52 AM

नायजेरीया : नायजेरीयात (Nigeria Attack) झालेल्या हल्ल्यात 50 जण ठार झालेत. एका चर्चमध्ये (Owo Church Attack) करण्यात आलेल्या हल्ल्यात महिला मुलांसह निष्पाप 50 जणांचा जीव गेला आहे. स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एका चर्चमध्ये हा हल्ला करण्यात आला. रविवारी मास प्रार्थनेदरम्यान हा हल्ला (Attack) करण्यात आला. या हल्ल्यानं नायजेरीयात खळबळ माजलीये. अनेकजण या हल्ल्यात जखमी झालेत. या हल्ल्यानंतर चर्च परिसरात एकच गोंधळ उडाला होता. रविवारी सकाळी नायजेरीयातील एका चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी काही कॅथलिक बांधव जमले होते. त्यावेळी शस्त्रास्त्र घेऊन आलेल्यांनी चर्चला टार्गेट केलं. यात प्रार्थनेसाठी आलेल्या महिला आणि मुलांना निशाणा बनवण्यात आलं होतं.

नेमका कुठे झाला हल्ला?

नायजेरीयात ओंडो नावाचं राज्य आहे. या राज्यातील ओवो शहरात रविवारी सकाळी बंदूक घेऊन आलेल्यांनी चर्चवर हल्ला केला. चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेवेळी हा हल्ला करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. हल्ला करण्यासाठी स्फोट करणयात आला. त्यानंतर बेछुट गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारात जवळपास 50 जणांचा हल्लेखोरांनी जीव घेतला. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. मृतांची अचूक संख्या सांगणं कठीण असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तर जखमींना सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलंय. औंडू राज्याच्या सरकारकडूनही या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

हल्ल्यामागे कुणाचा हात?

चर्चवर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. चर्चवर झालेल्या हल्ल्याविरोधात नायजेरीयात तीव्र निषेध आणि संताप व्यक्त केला जातोय.