Pakistan-Balochistan : बलूच बंडखोरांविरोधात ऑपरेशनमध्ये उलटं पाकिस्तानी सैन्याचं नुकसान, मोठा सैन्य अधिकारी गमावला

Pakistan-Balochistan : पाकिस्तानी सैन्याने बलूचिस्तानच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बलूचिस्तानात पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सुरु केलं. पण यात त्यांनाचं फटका बसला. 7 बलूच बंडखोर मारले गेले. पण यात पाकिस्तानचं नुकसान सुद्धा कमी झालं नाही.

Pakistan-Balochistan : बलूच बंडखोरांविरोधात ऑपरेशनमध्ये उलटं पाकिस्तानी सैन्याचं नुकसान, मोठा सैन्य अधिकारी गमावला
Pak Army (Representative Image)
Image Credit source: PTI
| Updated on: May 14, 2026 | 10:23 AM

पाकिस्तानात बलूचिस्तानचा प्रश्न दीर्घकाळापासून आहे. बलूचिस्तानात राहणारे लोक पाकिस्तानला आपला देश मानत नाहीत. पाकिस्तानापासून स्वतंत्र होण्याची त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पाकिस्तानी सैन्य बलूच नागरिकांवर अत्याचार करतं. त्यांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने आतापर्यंत अनेकदा क्रूरता केली आहे. बलूच बंडखोरांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानकडून अभियानं राबवली जातात. बलूचिस्तानातील बंडखोर गटांनी आता पाकिस्तानी सैन्या विरोधात सशस्त्र लढा उभा केला आहे. पाकिस्तानी सैन्याला वेळोवेळी त्याची किंमत सुद्धा चुकवावी लागली आहे. पाकिस्तानला आपल्या सैन्य शक्तीच्या बळावर बलूचिस्तानातील नैसर्गिक साधन संपत्ती हडप करायची आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मिडिया विंग नुसार, बलूचिस्तानच्या बरखान जिल्ह्यात दहशतवाद्यांविरुद्ध चालवलेल्या एका ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या एका मेजरसह पाच पाकिस्तानी सैनिक मारले गेले. बलूच बंडखोर मारले गेले असले तरी पाकिस्तानी सैन्याचं सुद्धा तितकचं नुकसान झालं आहे.

इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सने (ISPR) बुधवारी रात्री या ऑपरेशनबद्दल माहिती दिली. यात 7 दहशतवादी मारले गेले. पण पाकिस्तानी सैन्याच्या मेजरसह पाच सैनिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्य आणि बलूचिस्तान फ्रंटियर कोरने बरखान नोशाम भागात ‘क्लीन अप’ ऑपरेशनसाठी मोहिम सुरु केलेली. पाकिस्तानी सैन्याकडून बलूच बंडखोरांविरोधात अशी ऑपरेशन्स सुरु आहेत. पहिल्या चार महिन्यात सुरक्षा पथकांकडून बलूचिस्तानात अनेक क्लीन-अप ऑपरेशन्स करण्यात आले. मार्च महिन्यात हरनाई आणि बासीमा जिल्ह्यात कमीत कमी 15 बंडखोर मारले गेले. फेब्रुवारी महिन्यात झोब भागात चालवलेल्या ऑपरेशन्समध्ये 10 दहशतवादी मारले गेले.

पाकिस्तान विरोधात असंतोष

बलूचिस्तान हा पाकिस्तानातील अशांत प्रदेश आहे. फार पूर्वीपासून तिथे पाकिस्तान विरोधात असंतोष धगधगत आहे. कारण या भागांपर्यंत विकास कधी पोहोचलाच नाही. बलूच बंडखोर अनेकदा पाकिस्तानी सैन्य आणि सरकारी पायाभूत सुविधांना टार्गेट करतात. पाकिस्तान सरकार अशा हल्ल्यांसाठी बलूच लिबरेशन आर्मी आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यांना जबाबदार धरते.

वर्दळीच्या बाजारात बॉम्ब स्फोट

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या उत्तर पश्चिमेला मंगळवारी एका वर्दळीच्या बाजारात बॉम्ब स्फोट झाला. आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली रिक्षा उडवून दिली. यात दोन पाकिस्तानी पोलिसांसह कमीत कमी 9 लोकांचा मृत्यू झाला. 33 जण जखमी झाले. खैबर पख्तूनख्वाच्या लक्की मरवत जिल्ह्यात ही घटना घडली. आत्मघातकी हल्लेखोराने नौरंग बाजाराच्या फाटक चौकावर स्फोटकांनी भरलेली रिक्षा उडवून दिली.

 

Follow Us