रद्दीतील एका कागदाच्या तुकड्यामुळे भावाचं नशीब फळफळ; खात्यात जमा झाले 10,27,79,580 रुपये

रद्दीमध्ये पडलेल्या एखाद्या कागदामुळे तुम्ही कोट्यधीश व्हाल असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही, मात्र ही घटना वास्तवात घडली आहे.

रद्दीतील एका कागदाच्या तुकड्यामुळे भावाचं नशीब फळफळ; खात्यात जमा झाले 10,27,79,580 रुपये
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 6:30 PM

प्रत्येकाच्याच घरात एक खोली किंवा कपाट असं असतं ज्यामध्ये तुम्ही घरातील टाकाऊ वस्तू, भंगार आणि रद्दी जमा करत असतात. मात्र जेव्हा तुम्ही या खोलीमध्ये, कपाटामध्ये एखादी वस्तू शोधण्यासाठी जाता, तेव्हा तुमच्यासमोर अनेक वस्तू येतात. त्यातील काही वस्तू या तुमच्या बालपणाच्या आठवणीशी निगडीत असतात, त्यामुळे तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. काही वेळेला तुम्हाला तिथे एखादी अशी वस्तू आढळून येते, ती या सर्वांपेक्षा वेगळी असते. मात्र रद्दीमध्ये पडलेल्या एखाद्या कागदामुळे तुम्ही कोट्यधीश व्हाल असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही, मात्र एका व्यक्तीसोबत हा किस्सा घडला आहे. रद्दीत पडलेल्या एका कागदाच्या तुकड्यामुळे हा व्यक्ती करोडपती बनला आहे.

रद्दीत सापडलं पासबुक

ही घटना घडली आहे, चिलीमध्ये एक्सेक्विएल हिनोजोसा नावाचा एक व्यक्ती आपल्या घरात असलेली स्टोअरूम साफ करत होता, त्याचवेळी त्याची नजर रद्दीत असलेल्या एका कागदावर पडली.त्याला तो कागद थोडा वेगळा वाटला. त्याने तो कागद आपल्या हातात घेऊन काळजीपूर्वक पाहिला. त्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो कागद म्हणजे त्याच्या वडिलांचं जुनं पासबुक होतं. त्याच्या वडिलांचं दहा वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

तो ते पासबुक जेव्हा बँकेत घेऊन गेला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. बँक वाल्यांनी त्याला सांगितलं की, 62 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी घर खरेदी करायचं म्हणून 1.4 लाख रुपये बँकेत जमा केले होते. मात्र याची कल्पना घरातील कोणत्याच सदस्याला नव्हती. त्यानंतर त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे या पैशांबाबत त्याच्या कुटुंबाला कधीच माहिती मिळू शकली नाही. मात्र 1.4 लाख रुपयांवर व्याज मिळून 62 वर्षांमध्ये त्याच्या वडिलांच्या खात्यात तब्बल 10,27,79,580 अर्थात 10 कोटी 27 लाख 79 हजार ,580 रुपये जमा झाले होते. हा व्यक्ती एकाच दिवसात करोडपती बनला. त्यानंतर तो आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये चांगलाच भावुक झाला. त्याच्या वडिलांच्या घराचं स्वप्न त्याने आता पूर्ण केलं आहे.