
पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाच्या G7 शिखर सम्मेलनाला गेले आहेत. तिथे पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. भारत आणि इटलीमधल्या वाढत्या मैत्रीबद्दल पीएम मोदी म्हणाले की, ‘द्विपक्षीय संबंध भक्कम होतील. त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल’ जी-7 शिखर सम्मेलना दरम्यान पीएम मोदी यांनी इटलीसोबतच दक्षिण आफ्रिका, ब्राझील, जपान, फ्रान्ससह अनेक देशांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत चर्चा केली. एका व्हिडिओमध्ये पीएम मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींची भेट घेताना दिसत आहेत. दोन्ही नेत्यांनी परस्परांशी हस्तांदोलन केलं. शिखर सम्मेलनादरम्यान त्यांच्यात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या भेटीनंतर पीएम मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पीएम मोदींसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला. “इटली आणि भारत मजबूत मैत्रीच्या धाग्याने परस्परांशी जोडलेले आहेत” असं पोस्ट शेअर करताना मेलोनी यांनी लिहिलं आहे. मेलोनी यांच्या या पोस्टवर पीएम मोदींनी सहमती दर्शवली. भारत आणि इटलीच्या वाढत्या मैत्रीच कौतुक केलं. “पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. इटलीसोबत भारताची मैत्री मजबूत होत राहिलं. त्याने आपल्या लोकांचा भरपूर फायदा होईल” असं पीएम मोदी यांनी लिहिलं आहे
भारत-इटलीमध्ये नातं होतय मजबूत
याआधी सुद्धा पीएम मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीची चर्चा झाली आहे. दुबईत COP28 शिखर सम्मेलनादरम्यान दोघांचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झालेला. तो फोटो पोस्ट करत मेलोनी यांनी कॅप्शन दिलेलं की, “COP28 मध्ये माझे चांगले मित्र, #मेलोडी”. भारतात G20 शिखर सम्मेलनाच्यावेळी सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय दिसून आलेला.
Fully agree with you, PM Giorgia Meloni. India’s friendship with Italy will continue to get stronger, greatly benefitting our people!@GiorgiaMeloni https://t.co/LaYIIZn8Ry
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025
G7 परिषदेत सहभागी होण्याची मोदी यांची ही कितवी वेळ ?
भारत आणि इटलीमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढलं आहे. सोबतच द्विपक्षीय संबंधांचा धागा अजून मजबूत केला जात आहे. पीएम मोदी G7 शिखर सम्मेलनात सहभागी होण्यासाठी कॅनडा कनानास्किस येथे गेले आहेत. तिथे कॅनडाचे पीएम मार्क कार्नी यांनी त्यांचं स्वागत केलं. G7 शिखर सम्मेलनात पीएम मोदी सलग सहाव्यांदा सहभागी झाले. मागच्या दहा वर्षातील त्यांचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे. कॅनडामध्ये दाखल होताच पीएम मोदी यांचं कॅलगरी एअरपोर्टवर भव्य स्वागत करण्यात आलं.