
Russian Army Allegations : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची संपूर्ण जगाने धास्ती घेतलेली आहे. दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातही गाझा पट्टीत मोठा संघर्ष चालू आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेलेला आहे. यात काही चिमुकल्यांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामध्येही आतापर्यंत हजारो सैनिक आणि दोन्ही देशांचे सामान्य नागरिक मारले गेले आहेत. दरम्यान, संपूर्ण जगच या दोन युद्धांमुळे चिंतेत असताना संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी रशिया आणि इस्रायल यांच्या सैन्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. या दोन्ही देशांच्या सैनिकांकडून मोठ्या प्रामाणात लैंगिक हिंसा केली जात आहे, असा रिपोर्टच समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी नुकेतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला युद्ध, संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसोबाबतचा एक वार्षिक रिपोर्ट सादर केलेला आहे. या वार्षिक अहवालात रशियन आणि इस्रायल देशांच्या सैनिकांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या दोन्ही देशांचे सैनिक युद्धादरम्यान लैंगिक छळाच्या प्रकरणात सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अँटोनियो गुटेरेस यांनी रशिया आणि इस्रायल यांना याबाबत एक नोटीसही दिली आहे.
अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल आणि रशिया या दोन्ही देशांना नोटीस दिली आहे. या नोटिशीत तुमच्या देशाचे सैनिक, सुरक्षारक्षक, सशस्त्र बलाच्या जवानांना युद्धक्षेत्रात लैंगिक हिंसा करण्याच्या आरोपात संशयित सैनिकांच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे. अल जजिराने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गुटेरेस यांनी इस्रायलला दिलेल्या नोटिशीत इस्रायली सशस्त्र बल, सुरक्षाबलांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याबाबत आम्ही गंभीरपणे चिंतेत आहोत, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच अल जजिराच्या रिपोर्टनुसार या लैंगिक छळात लोकांना खूप वेळ नग्न ठेवणे, अपमानित करून वारंवार लोकांचे कपडे काढून त्यांची झडती घेणे अशी कृत्ये केली जात आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.
तर रशियाला दिलेल्या नोटिशीत युक्रेन, रशियात असलेल्या 50 अधिकृत आणि 22 अनौपचारिक अटक केंद्रात युक्रेनमधील कैद्यांसोबत केल्या जाणाऱ्या लैंगिक हिंसेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जननेंद्रीयांना इजा पोहोचवणे, जननेंद्रीयांना चटके देणे, जबरदस्तीने लोकांचे कपडे काढून त्यांना खूप वेळ तसेच ठेवणे अशा प्रकारच्या कृत्यांचा समावेश असल्याचेही या नोटिशीत नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता रशिया आणि इस्रायल नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.