H-1B Visa : भारतीयांना मोठा धक्का, अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नाला तडा; आकडेवारीने वाढवली चिंता !

अमेरिकेत भारतीयांना मिळणाऱ्या व्हिसा अनुदानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांत H-1B, H4, F1, L1 आणि L2 व्हिसामध्ये भारताला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे, तर चीन, नेपाळ आणि व्हिएतनामला याचा फायदा झाला आहे.

H-1B Visa : भारतीयांना मोठा धक्का, अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नाला तडा; आकडेवारीने वाढवली चिंता !
| Updated on: Sep 24, 2025 | 9:36 AM

H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे जगभरात मोठा धक्का बसला असून गोंधळाचे वातावरण आहे. अमेरिकेत जाऊन, तिथे शिकून, तिथेच काम करणाऱ्या भारतीयांचा रास्ता दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. फक्त H-1B व्हिसाचीच कमतरता नव्हे तर भारतीय कुटुंब आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या H4 (कुटुंबासाठी), F1 (विद्यार्थ्यांसाठी), L1 (कंपनी ट्रान्स्फरस ) आणि L2 (या व्हिसा धारकांच्या कुटुंबासाठी) व्हिसांमध्येही मोठा धक्का बसला आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत या व्हिसा श्रेणींमध्ये भारताला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे, तर चीन, नेपाळ आणि व्हिएतनाम सारख्या देशांना याचा फायदा झाला आहे.

आकडेवारीने वाढवली चिंता

या वर्षी मे महिन्यापर्यंत H-1B व्हिसा धारकांच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जाणारे फक्त 46,982 एच4 व्हिसा जारी करण्यात आले, तर 2023मध्ये हा आकडा 71,130 इचका होता. म्हणजेच सुमारे 34 टक्के घड झाली आहे. तर मेक्सिकोने त्यांचे H4 व्हिसाचे प्रमाण दुप्पट केले आहे आणि घाना, दक्षिण आफ्रिका आणि फिलीपिन्समध्येही वेगाने वाढ झाली आहे. चीननेही हा व्हिसाचा आकडा 10.7% ने वाढवला आहे.

F1 विद्यार्थी व्हिसाची परिस्थिती आणखी चिंताजनक आहे. 2023 मध्ये भारताला हे अंदाजे 17,800 व्हिसा मिळाले होते, आता ती आकडेवारी कमी होऊन 11,484 झाली आहे. म्हणजेच 35 टक्के घट दिसून आली. चीनमध्ये सुमारे 10०% वाढ झाली, तर व्हिएतनाममध्ये 40 % पेक्षा जास्त वाढ झाली आणि नेपाळमध्ये तब्बल 260 % वाढ झाली. झिम्बाब्वे आणि केनिया सारख्या आफ्रिकन देशांमध्येही तिप्पट अंकी वाढ झाली.

भारतात कंपनी अंतर्गत हस्तांतरणासाठी असलेल्या L1 व्हिसामध्ये 28 % घट झाली. L2 व्हिसामध्येही सुमारे 38 % घट झाली. दरम्यान, चीनमध्ये अनुक्रमे 64 % आणि 43 % ची लक्षणीय वाढ झाली आहे. इस्रायल, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्राझीलमध्येही L1 आणि L2 व्हिसामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

दक्षिण आशियात भारत पिछाडीवर का ?

दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत, भारताला सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. नेपाळमध्ये F1 व्हिसामध्ये 262 % आणि L2 व्हिसामध्ये 113 % ची मोठी वाढ झाली आहे. बांगलादेशमध्ये H4 व्हिसामध्ये 28 % आणि F1 व्हिसामध्ये 5 % कमी वाढ झाली आहे. पाकिस्तानने F1 व्हिसा जवळजवळ दुप्पट केला आहे आणि H4 व्हिसा देखील 40 % ने वाढला आहे. श्रीलंकेत परिस्थिती अधिक मिश्र आहे, जिथे H4 व्हिसा वाढले आहेत परंतु विद्यार्थी व्हिसा कमी झाले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन वर्षांत H-1B व्हिसाची संख्या 37 % पेक्षा जास्त घटली आहे. याचा परिणाम केवळ काम करणाऱ्या व्यक्तींवरच नाही तर त्यांच्या कुटुंबांवर आणि शैक्षणिक संधींवरही झाला आहे. शिवाय, एच-1बी व्हिसासाठी 1 लाख डॉलर्सचे शुल्क आकारण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीय उमेदवारांच्या अपेक्षांवर मोठा भार ठरू शकतो.