Smit Machchhar Health Update: चिंता वाढली..? डोकं फुटलं, नजर कमकुवत, प्रचंड डोकेदुखी; स्मित मच्छार यांची तब्येत आता कशी?
फ्लाईदुबई हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कॅप्टन स्मित मच्छार यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची नजर कमकुवत झाली असून तीव्र डोकेदुखीचा सामना करत आहेत. डॉक्टरांनी डोक्यावर शस्त्रक्रिया केली असली तरी वेदना नियंत्रणासाठी हेवी डोस दिले जात आहेत. या स्थितीतही मच्छार सकारात्मक असून विमान उडवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

फ्लाईदुबईच्या तेल अवीवला जाणाऱ्या विमानात को-पायलटने केलेल्या हल्ल्यात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार हे गंभीर जखमी झालेले आहेत. या घटनेला आठ दिवस होत आले तरी मच्छार यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात स्मित मच्छार यांचं डोकं फुटलं होतं. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या त्यांची नजर कमकुवत झाली आहे. सौदी अरेबियातील डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याची सर्जरी केली. त्यानंतर त्यांना यूएईला नेण्यात आलं. तिथे त्यांची कमकुवत झालेली नजर आणि न्यूरॉलॉजिकल स्थितिवर डॉक्टर नजर ठेवून आहेत. मात्र, सध्या तरी त्यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमध्ये कुऱ्हाडीने हल्ला केल्याने स्मिच मच्छार यांचं डोकं फुटलं होतं. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांची नजर कमकुवत झाली होती. सर्जरी झाल्यानंतरही त्यांची डोकेदुखी थांबलेली नाही. त्यांचं डोकं प्रचंड दुखत आहे. डोकेदुखीपासून आराम मिळावा म्हणून त्यांना हेवी डोज दिले जात आहेत. तसेच झोपेच्या गोळ्याही दिल्या जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं. एवढा प्रचंड त्रास होऊनही स्मिच मच्छार हे अत्यंत सकारात्मक आहेत. विमान उडवायचं असल्याचं ते वारंवार म्हणत आहेत.
साक्ष नोंदवली
दरम्यान, तपास यंत्रणांनी स्मिच मच्छार यांची साक्ष नोंदवली आहे. कॉकपिटमध्ये नेमकं काय झालं? को-पायलट काय बोलत होता? आदी माहिती यंत्रणांना घ्यायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही माहिती घेण्यात येत आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
नेतन्याहू यांचा फोन
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी स्मित यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. हल्ल्याच्या पूर्वी सहपायलटने प्रार्थना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्याच्या इच्छेचा मान राखून मी दुसरीकडे वळलो. त्याचा फायदा घेऊन काही मिनिटातच सहपायलटने माझ्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर तो माझ्यावर एकसारखा हल्ला करत सुटला होता, असं स्मित मच्छार यांनी नेतन्याहू यांना सांगितलं.
यावर इतक्या कठिण प्रसंगातही साहस आणि संयम राखल्याबद्दल मला तुमचं कौतुक वाटतं. तुम्ही इतक्या लोकांचा जीव वाचवला. आपत्कालीन स्थितीत तुम्ही विमानाला सौदीमध्ये उतरवलं, असं नेतन्याहू म्हणाले.
कॉकपिटमध्ये काय झालं होतं?
30 सप्टेंबर 2026 रोजी ही घटना घडली होती. फ्लायदुबईची FZ107 फ्लाइट दुबईहून तेव अवीवला जात होती. सुमारे 34 हजार फूट उंचावर ओमानी को-पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात स्मित गंभीर जखमी झाले. त्यामुळे विमान वेगाने खाली पडू लागले. क्रॅश होण्याची भीती होती. त्यांनी आधी कॉकपीटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण को-पायलटने तो बंद केला. त्यानंतर स्मित यांनी प्रचंड ताकद लावून दरवाजा खोललाच. त्यानंतर प्रवाशी आत आले आणि त्यांनी हल्लेखोराला पकडलं.