
वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. भारत आणि फ्रान्समध्ये राफेल फायटर जेट संदर्भात एक मोठा करार होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये डील फायनल होऊ शकते. यात राफेलचे आधुनिक वर्जन F4 आणि F5 यांचा समावेश आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये करारावर स्वाक्षरी होऊ शकते. या डील अंतर्गत भारत फ्रान्सकडून 114 फायटर विमानं विकत घेणार आहे. राफेल फायटर जेट्सची आतापर्यंतची ही सर्वात मोठी डील असेल.
दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या करारांच वैशिष्ट्य म्हणजे राफेल विमानांचा काही भाग भारतात बनवला जाईल. त्यामुळे मेक इन इंडिया अभियानाला प्रोत्साहन मिळेल. सोबतच देशात रोजगार निर्मिती होईल. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डीलचा एकूण खर्च 3.25 लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. या करारातंर्गत भारताला 18 राफेल विमान उड्डाण योग्य म्हणजे फ्लाई-अवे कंडीशनमध्ये मिळणार आहेत. उर्वरित विमानांची निर्मिती भारतातच होईल. यात जवळपास 60 टक्के स्वेदशी उपकरणांचा वापर केला जाईल.
भारतीय कंपन्यांना या प्रोजेक्टशी जोडलं जाईल
दोन टप्प्यांमध्ये ही डील होणार आहे. पहिल्या टप्प्यात भारताला 90 नवीन राफेल F4 विमान मिळतील. सोबतच सध्या इंडियन एअर फोर्सकडे असलेल्या 36 राफेल विमानांना F4 लेव्हलने अपग्रेड केलं जाईल. दुसऱ्या टप्प्यात भारत 24 F5 राफेल विमाने विकत घेईल. पण ही विमानं फ्रान्समध्येच बनवली जातील. सूत्रांच्या माहितीनुसार, राफेल विमानांची फायनल असेंब्ली लाइन नागपूरमध्ये स्थापित केली जाईल. अनेक भारतीय कंपन्यांना या प्रोजेक्टशी जोडलं जाईल.
फ्रान्सचे राष्ट्रपती भारतात कधी येणार?
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो पुढच्या महिन्यात 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येऊ शकतात. यावेळी राफेल डीलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय एअरफोर्स राफेल जेटच्या कामगिरीवर समाधानी आहे. यामुळे भारताची हवाई ताकद आणखी वाढणार आहे.