Trishuli-3 A Hydropower : चिखल, पाणी, 898 लोक फसले, अडकलेल्यांना बाहेर कसं काढलं जातंय? रेस्क्यू ऑपरेशनचा थरार समोर!

Trishuli 3A Hydropower Tunnel : नेपाळमध्ये महापुरामुळे खळबळ उडाली आहे. काही लोक हे हायड्रोपॉवर प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेले आहेत. या बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

Trishuli-3 A Hydropower : चिखल, पाणी, 898 लोक फसले,  अडकलेल्यांना बाहेर कसं काढलं जातंय? रेस्क्यू ऑपरेशनचा थरार समोर!
trishuli 3a hydropower tunnel rescue operation
Image Credit source: X
बापू गायकवाड | Updated on: Aug 30, 2026 | 9:46 PM

अचानक आलेल्या महापुरामुळे नेपाळमध्ये खळबळ उडाली आहे. या पुरामुळे हजारो लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच 600 पेक्षा जास्त लोकांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. अद्यापही शेकडो लोक बेपत्ता आहेत. यातील काही लोक हे हायड्रोपॉवर प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेले आहेत. या बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. सुमारे 898 कर्मचारी बोगद्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत 361 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

त्रिशूली-3 ए हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्यात सुरू असलेल्या बचावकार्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. बचाव पथकांकडून यंत्रांच्या मदतीने बोगद्यातील माती आणि गाळ हटवण्याचे काम सुरू आहे. बोगद्यात सुमारे 6 इंचांचे छिद्र पाडून पाइपच्या माध्यमातून आत हवा पोहोचवली जात आहे. आता हे छिद्र आणखी मोठे करून मॅनहोल तयार करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे बचाव पथकाला बोगद्याच्या आत प्रवेश करून अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेता येणार आहे.

Loading...

बचावकार्याच्या आशा वाढल्या

त्रिशूली-3A हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्याचा मार्ग मलबा, चिखल, वाळू आणि दगडांमुळे बंद झाला आहे होता. सध्या बोगद्याचे प्रवेशद्वार मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी मॅनहोल तयार करण्यात आला असून, बचावकार्यासाठी लष्कराचे जवान बोगद्यात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. छिद्रातून आतमध्ये मोकळी जागा दिसून आल्याने बचाव पथकाच्या आशा वाढल्या आहेत. लवकरच आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

त्रिशूलीत अशोक चौरसिया यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त

उत्तर प्रदेशातील बलिया येथील व्यापारी अशोक चौरसिया हे गेल्या 20 वर्षांपासून नेपाळमधील त्रिशूली बाजारात कपड्यांचा व्यवसाय करत आहेत. मात्र, पुरामुळे त्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले असून, कुटुंबातील दोन सदस्यांनाही त्यांनी गमावले आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्रिशूली बाजारात माझी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली आहे. माझी मेहुणी आणि माझा भाचा पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. नेपाळ पोलिसांनी एक मृतदेह बाहेर काढला, मात्र तो इतका कुजलेल्या अवस्थेत होता की, पोलिसांनी मला सांगितले की त्यांच्यावर अंत्यसंस्कारही त्यांनाच करावे लागले. माझ्याकडे आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. अंगावर घातलेला हा शर्टसुद्धा मी कोणाकडून तरी उधार घेतला आहे.’

नेपाळमधून काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ

नेपाळमधील पुरामुळे अनेकांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक लहान मुलगा आपल्या चिमुकल्या बहिणीला पाठीवर उचलून आई-वडिलांचा शोध घेत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे दुःख आणि जखमांच्या खुणा पाहून अनेकांचे मन हेलावून गेले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us