
Russia And Ukraine War : गेल्या कित्येक दिवसांपासून युक्रेन आणि रशियात युद्ध चालू आहे. या युद्धात दोन्ही देशांचे मोठी जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. विशेष म्हणजे काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका दोन्ही देशांनी घेतली आहे. सध्या या दोन्ही देशांत मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. असे असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे संकेत रशियाने द्यायला सुरुवात केली आहे. रशियाकडून युक्रेनवरील हल्ल्यांत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
गेल्या आठ ते दहा तासांपासून रशियन सैनिक युक्रेनवर जोरदार हल्ला करत आहेत. एअर स्ट्राईकच्या माध्यमातून युक्रेनच्या परिसराला लक्ष्य केले जात आहे. झेलेन्स्की यांच्या घोषणेनंतर रशियाने हे हल्ले वाढवले आहेत. आम्ही रशियाच्या शर्तींवर युद्धविराम करणार नाही. तसेच आम्ही रशियाला एक इंचही जमीन देणार नाही, अशी थेट घोषणाच झेलेन्स्की यांनी केली आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळे आता रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांतील युद्ध जास्तच भडकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता या दोन्ही देशांत युद्धविरामाची शक्यता मावळल्याचे बोलले जात आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. दोन्ही बलशाली देशांचे सर्वोच्च नेते हे 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे भेटणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविराम करण्याच्या अटींवर ट्रम्प आणि पुतिन यांचे एकमत झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच या भेटीला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र आता झेलेन्स्की मात्र या युद्धविरामासाठी तयार नाहीत. आम्ही रशियाच्या अटीवर युद्धविराम करणार नाही. तसेच आम्ही रशियाला एक इंचही जमीन देणार नाही, असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. त्यामुळेच आता नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
झेलेन्स्की यांनी आम्ही रशियाच्या अटी-शर्तींवर युद्धविराम करणार नाही, असं सांगितलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धविरामाची शक्यता धुसर झाली आहे. झेलेन्स्की यांच्या निर्णयानंतर आता युद्धाची ही आग आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अलास्का येथे होणाऱ्या ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीचं महत्त्वच कमी झालं आहे. एकीकडे ट्रम्प रशिया आणि युक्रेन यांच्यात शांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण झेलेन्स्की यांच्या विधानामुळे आता या प्रयत्नांनाच एका प्रकारे हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? झेलेन्स्की यांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.