48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट ? राष्ट्राध्यक्षांनी केला मोठा गौप्यस्फोट

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिका आणि इस्रायलवर 48 तासांत इराणवर नियंत्रण मिळवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट ? राष्ट्राध्यक्षांनी केला मोठा गौप्यस्फोट
इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा खळबळजनक दावा
| Updated on: Aug 06, 2026 | 9:39 AM

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेला इराण- अमेरिका संघर्ष अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही.  हा तणाव कायम असतानाच, याचरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘ अमेरिका आणि इस्रायलने अवघ्या 48 तासांत इराणवर नियंत्रण मिळवण्याचा कट रचला होता’, असा खळबळजनक दावा पेजेशकियन यांनी केला आहे. सीरियाप्रमाणेच इराणलाही नामोहरम करता येईल, सहज गुडघे टेकवता येईल, असा दोन्ही देशांचा समज होता. मात्र, सर्व दबाव आणि संकटांवर मात करत इराण आजही खंबीरपणे उभा असून जगात सन्मानाने वावरत आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

“त्यांना वाटत होतं की, सीरियात जे घडलं तेच इराणमध्येही घडेल आणि ते केवळ 48 तासांत देशावर ताबा मिळवतील. मात्र, त्यांचा हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला” असं एका कार्यक्रमात बोलताना पेजेशकियन म्हणाले. मात्र युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक निर्बंध आणि बाह्य दबाव अशा अनेक आव्हानांना इराणला सामोरे जावे लागले, तरीही देशाने आपली ताकद कायम ठेवली, असं त्यांनी पुढे नमूद केलं.

अमेरिका-इराण चर्चेबाबत भूमिका स्पष्ट

दरम्यान, इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी अमेरिका-इराण संबंधांबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केलं. त्यांच्या मते, अलीकडील हल्ल्यांनंतर अमेरिकेकडून चर्चेचा संदेश आला होता. मात्र, सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुझ सामुद्रधुनीवर ठाम भूमिका

होर्मुझ सामुद्रधुनीबाबत सुरू असलेल्या संभाव्य कराराच्या चर्चांवरही गरीबाबादी यांनी भाष्य केले. या प्रश्नावर कोणत्याही परकीय शक्तीची मध्यस्थी किंवा हस्तक्षेप इराण स्वीकारणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. अमेरिकेला या सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक सुरळीत राहावी, अशी अपेक्षा असली तरी इराणने आपल्या सार्वभौम भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मोजतबा खामेनेई यांच्याशी संपर्क साधणं कठीण

राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाबाबतही माहिती दिली. मोजतबा खामेनेई यांच्याशी सध्या संपर्क साधणे अत्यंत कठीण आहे, असं ते म्हणाले. मात्र, त्यांचे नेतृत्व आणि उपस्थिती देशासाठी मोठे बळ असून, इराणच्या स्थैर्य आणि भविष्यासाठी ते महत्त्वाचे असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या या विधानांमुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमेरिका-इराण संबंध, होर्मुझ सामुद्रधुनीचा प्रश्न आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us