
दिवसेंदिवस रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन दोन अणवस्त्र पाणबुड्या रशियाला घेरण्यासाठी निघाल्या आहेत. या पाणबुड्या कुठे तैनात होणार, याचा खुलासा अमेरिकेने केलेला नाही. ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प रशियाच्या संरक्षण परिषदेचे सदस्य दिमित्री मेदवेदेव यांच्या वक्तव्यावर नाराज आहेत. “मूर्खपणाच्या, चिथावणीखोर वक्तव्याचा सामना करण्यासाठी मी दोन अणवस्त्र पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत” डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्टवरुन ही माहिती दिली. ट्रम्प यांनी असं सुद्धा लिहिलय की, ‘शब्द महत्त्वाचे आहेत. त्यातून अनपेक्षित परिणाम येऊ शकतात’
युक्रेनसोबत सीजफायर करण्यासाठी ट्रम्प यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 10 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यासाठी आता कमी दिवस उरले आहेत. पुतिन ऐकले नाहीत, तर त्यांना अजून अमेरिकी निर्बंधाचा सामना करावा लागेल असा ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. युक्रेनमध्ये शांततेसाठी रशिया अनुकूल नसल्याने ट्रम्प नाराज आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चांगलं बोलणं होतं. पण मॉस्को युक्रेनवर हल्ले सुरुच ठेवतो अशी तक्रार ट्रम्प यांची आहे.
त्यांनी त्यांच्या शब्दांकडे लक्ष दिलं पाहिजे
ट्रम्प यांनी एकदिवस आधीच भारत आणि रशियावर निशाणा साधला. रशिया आणि भारत मिळून आपली डेड इकोनॉमी उद्धवस्त करतील, असं ट्रम्प म्हणाले. मेदवेदेव यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. माजी राष्ट्रपतींना असं वाटत असेल की ते अजूनही राष्ट्रपती आहेत, तर त्यांनी त्यांच्या शब्दांकडे लक्ष दिलं पाहिजे.
डेड हँड सुद्धा लक्षात ठेवला
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर मेदवेदेव यांनी टेलिग्राम चॅनलवर लिहिलय की, “भारत आणि रशियाच्या डेड इकोनॉमीचा प्रश्न असेल, तर ट्रम्प यांनी आपल्या इथल्या वॉकिंग डेड सारख्या चित्रपटांच स्मरण केलं पाहिजे. त्यांनी डेड हँड सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे”
काय होता डेड हँड?
ट्रम्प यांच्या वक्तव्याला उत्तर देताना मेदवेदेव यांनी डेड हँडचा उल्लेख केला. डेड हँड एक अशी व्यवस्था आहे, जी सोवियत युनियनने शीत युद्धाच्यावेळी बनवली होती. ही एक स्वचालित प्रणाली होती. सोवियत युनियनवर हल्ला होताच, ही प्रणाली आपोआप Active होईल अशा पद्धतीची होती. अणवस्त्र हल्ला करण्याची या प्रणालीची क्षमता होती. अशावेळी मेदवेदेव यांचं वक्तव्य ट्रम्प यांना शीत युद्धाच्या काळाची आठवण करुन देणारं आहे. आता ट्रम्प यांनी अणवस्त्र पाणबुड्या पाठवण्याचा निर्णय घेतलाय. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढेल.