‘अजूनही अनेक लक्ष्य शिल्लक, जर शांतता नसेल तर पुन्हा…’, इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा

America Air Strikes In Iran: इराणने शांततेचा मार्ग स्वीकारला नाही, तर आपण त्या उर्वरित लक्ष्यांवर हल्ला करणार आहे. त्यापैकी बहुतेक काही मिनिटांत नष्ट केले जाऊ शकतात, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अजूनही अनेक लक्ष्य शिल्लक, जर शांतता नसेल तर पुन्हा..., इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा
| Updated on: Jun 22, 2025 | 9:44 AM

Iran Israel conflict: इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या ३ अणू प्रकल्पांवर बॉम्ब टाकले. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, मी जगाला सांगू शकतो की हे हल्ले एक मोठे लष्करी यश होते. इराणचे प्रमुख अणू प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले आहेत. इराणने अजूनही शांतता स्वीकारली नाही तर भविष्यातील हल्ले आणखी भयानक असतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

शांतता किंवा विनाश?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि इस्रायली सैन्याचे अभिनंदन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, इराणमध्ये शांतता असेल किंवा विनाश असेल. आज रात्री निवडलेले लक्ष्य सर्वात कठीण होते. अमेरिकेचे ध्येय इराणची अणू संवर्धन क्षमता नष्ट करणे होते. इराण गेल्या ४० वर्षांपासून अमेरिकेविरुद्ध काम करत आहे. अनेक अमेरिकन लोक या द्वेषाला बळी पडले आहेत. यामुळे आता हे सहन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश अणू बॉम्ब बनवत असेल तर ते सर्वांसाठी धोक्याचे होते.

ट्रम्प म्हणाले, आजची रात्र त्या ८ रात्रींपैकी सर्वात कठीण आणि कदाचित सर्वात प्राणघातक होती. पण जर इराणने शांततेचा मार्ग स्वीकारला नाही, तर आपण त्या उर्वरित लक्ष्यांवर हल्ला करणार आहे. त्यापैकी बहुतेक काही मिनिटांत नष्ट केले जाऊ शकतात. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तिन्ही अणुस्थळांना उद्ध्वस्त केले आहे. ट्रम्प यांनी या कारवाईबद्दल आपल्या देशाच्या सैन्याचे कौतुकही केले.

अमेरिका आधीपासून इराणच्या अणू बॉम्ब निर्मितीला विरोध करत आहे. त्यासंदर्भात अनेक वेळा अमेरिकेने इराणला इशारा दिला होता. त्यानंतरही इराणने अणू बॉम्ब बनवण्याचे सुरुच ठेवले. इराणच्या अणू उर्जा केंद्रात अनेक शास्त्रज्ञ काम करत होते. परंतु आता अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणचे मोठे नुकसान झाले आहे.