अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी

US Strikes on Iran : अमेरिकेने इराणविरुद्धचे हल्ले आणखी तीव्र केले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी
us strikes on iran
Image Credit source: Google
| Updated on: Jul 15, 2026 | 10:54 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेने इराणविरुद्धचे हल्ले आणखी तीव्र केले आहेत. अशातच आता इराणचे आरोग्यमंत्री यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या अलीकडील हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 260 जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमनपूर यांनी बुधवारी ही माहिती दिली. जखमींमध्ये 3 महिला आणि 6 मुलांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 222 जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात असल्याचेही केरमनपूर यांनी सांगितले आहे.

हुसेन केरमनपूर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, 260 नागरिक इराणवरील अलीकडील अमेरिकी हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत. यापूर्वी बुधवारी इराण सरकारच्या प्रवक्त्या फातेमेह मोहाजेरानी यांनीही दावा केला होता की, दक्षिण इराणवरील अलीकडील अमेरिकी हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. तसेच सरकार संपूर्ण ताकदीने नागरिकांसोबत उभे राहील, असे आश्वासन दिले.

इराणच्या सात जवानांचा मृत्यू

इराणी वृत्तसंस्था तस्नीमच्या वृत्तानुसार, इराणी लष्कराने म्हटले आहे की, अमेरिकेने सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील इरानशहर परिसरात असलेल्या बमपूर लष्करी तळावर 13 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 388व्या ब्रिगेडचे सात सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तळावरील सुरक्षा व्यवस्थेमुळे हानी मर्यादित प्रमाणात झाल्याची माहितीही इराणकडून देण्यात आली आहे.

इराणी लष्कराच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचा उद्देश जास्तीत जास्त नुकसान करणे हा होता. यासाठी लष्करी तळावरील गेस्टहाऊस, सुरक्षा चौक्या आणि निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला केवळ लष्करी तळाचे नुकसान करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर शक्य तितक्या लोकांना हानी पोहोचवण्याचा त्यामागचा हेतू होता, असा आरोपही इराणने केला आहे.

हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाणार

इराणच्या लष्कराने अमेरिकेला इशारा देताना म्हटले की, दक्षिण-पूर्व इराणमधील बमपूर लष्करी तळावर झालेल्या अमेरिकी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. लष्कराने या हल्ल्याला भ्याड कृत्य असे संबोधत, योग्य वेळी त्याला ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

Follow Us