मनोज जरांगे दारू पितात का? काय दिलं उत्तर? म्हणाले, मी आत्महत्याच…
सामाजिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर दारू पिण्याचे आरोप झाले. एका मुलाखतीत त्यांनी हे आरोप फेटाळले. 'मी दारू पित नाही, सिद्ध झाल्यास आत्महत्या करेन,' असे आव्हानच त्यांनी दिले. दहावीतील एक किस्साही त्यांनी सांगितला.

एखादा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आधी त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो. तो जर मॅनेज होत नसेल तर दबाव टाकला जातो. त्यानेही तो बधला नाही तर मग त्याचं चारित्र्य हनन केलं जातं. कुठल्या तरी स्त्रीसोबत त्याचं लफडं असल्याचं सांगितलं जातं. तरीही तो बदनाम होत नसेल तर तो अट्टल दारूडा असल्याचं सांगून त्याला निकालात काढलं जातं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंबाबतही असंच काही घडलेलं आहे. आधी त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला, नंतर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, नंतर चारित्र्य हनन झालं. नंतर ते दारूपित असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत जरांगे यांना तुम्ही दारू पिता का हो? असा थेट सवाल करण्यात आला. त्याला त्यांनी खुमासदार उत्तर दिलंय. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुम्ही दारू पिता का हो? असा सवाल विचारताच मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत नेटकं आणि खुसखुशीत शैलीत उत्तर दिलं. यावेळी त्यांनी इयत्ता 10वीत असतानाच किस्साही ऐकवला. पाणी पितो ना? बाकी काही पित नाही. पाणी ज्यात टाकून पितात ते नाही पित कधी. आपलं हाडूकच त्यानं बाटलेलं नाही. मी दारू पितो हे जर कोणी नार्को टेस्ट करून सिद्ध केलं तर त्याच दिवशी आत्महत्या करेन, असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे.
बोट बुडवलं अन्…
यावेळी त्यांनी एक किस्साही ऐकवला. एक अनुभव म्हणून सांगतो, इयत्ता 10वीची परीक्षा असताना आम्ही पोरं पोरं चकलांब्याला गेलो होतो. त्यावेळी थम्सअप की झमझम नावाची नवीनच बाटली आली होती. ती नेमकी लाल दिसत होती. पेपर सुटल्यावर पोरांनी ठरवलं. आपण हे थम्सअप प्यायचं. मग आम्ही एका हॉटेलात बसलो. पोत्याचंच हॉटेल होतं ते. त्यात आम्ही बसलो. आम्ही सर्वांनी मिळून एकच बॉटल घेतली होती. त्यातलं थम्स अप सर्वांना ग्लासात थोड थोड मिळून दिलं. मला ते लाल दिसलं. मी त्या आधी बोट बुडवलं. अन् चाटून पाहिलं. असं चुणचुण लागलं. तिथून मी जी धूम ठोकली ते घरच गाठलं. नको म्हटलं ही दारूफिरू, असा किस्सा जरांगे यांनी ऐकवला.
होय आहे लफडं…
दरम्यान, गेल्या आठवड्यात एका नेत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यांवर गंभीर आरोप केला होता. मनोज जरांगे यांचं एका महिलेशी लफडं असल्याचा आरोप या नेत्याने केला होता. त्यावरून जरांगे यांनी जोरदार टीका केली होती. होय, आहे माझं लफडं. दे आणून. करतो मी लग्न, असं म्हणत जरांगे यांनी या नेत्याला फटकारलं होतं. तुम्हाला आई, बहीण, मावशी, पोरी असतील ना? मग तुम्ही दुसऱ्यांच्या लेकीबाळींबद्दल असं कसं म्हणू शकता? कुणाची कशी अब्रू घेऊ शकता? तुम्हाला काही अक्कल आहे का? आंदोलनामध्ये अनेक महिला आणि पुरुष भेटतात. त्यांना फोटो काढावा वाटतो. ते काढतात. याचा अर्थ त्यांच्याशी लफडं आहे असं होतं का? असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला होता.
