दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, DA मध्ये 3 टक्के वाढ
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) 3% वाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे DA आता मूळ वेतनाच्या 63% झाला असून, कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ होईल, तर पेन्शनधारकांनाही लाभ मिळेल.

DA Hike : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवरच आला असून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक गुड न्यूज आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) यामध्ये 3 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 60 टक्क्यांवरून आता 63 टक्के झाला आहे. नवीन दर 1 जुलै2026 पासून लागू मानला जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ होणार असून, पेन्शनधारकांनाही महागाई सवलतीचा वाढीचा लाभ मिळणार आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढीसाठी सरकारने 10,016 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे 48 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. मात्र, महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार? चला जाणून घेऊया.
1 जुलैपासून मिळणार वाढीचा लाभ
वर्षातून दोन वेळा, म्हणजेच जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) यांच्या दरांमध्ये केंद्र सरकार सुधारणा करतं. वाढत्या महागाईचा आर्थिक भार कमी करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यावेळी जुलै 2026 च्या सुधारणेंतर्गत महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 60 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. आता हा दर वाढून 63 टक्के झाला आहे.
कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?
DA मध्ये 3 टक्के वाढ झाल्याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या सॅलरीवर होणार आहे. उदाहरणार्थ – एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ पगार 30 हजार रुपये असेल, तर त्याला आधी 18 हजार रुपये महागाई भत्त मिळायचा. आता 3 टक्के वाढ झाल्यावर डीए एकूण 63 टक्के असल्याने ही रक्कम वाढून 18,900 रुपये इतकी होईल. म्हणजेच कर्मचाऱ्याला दर महिन्याल 900 रुपये अतिरिक्त मिळतील. त्याचप्रमाणे, ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अधिक आहे, त्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीची रक्कमही अधिक असेल.
महागाई भत्ता(DA) म्हणजे काय ?
महागाई भत्ता (DA) महागाई भत्ता म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा आर्थिक भार कमी करण्यासाठी दिली जाणारी अतिरिक्त रक्कम. महागाईमुळे दैनंदिन गरजांवरील खर्च वाढतो आणि पैशांची क्रयशक्ती कमी होते. हा परिणाम कमी करण्यासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो.
