
Tahawwur Rana extradition: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाचा भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती अर्ज फेटाळला आहे. तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका न्यायाधीश एलेना कागन यांनी फेटाळली. 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाने भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती.
तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्याने भारतातील प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्याने याचिकेत म्हटले होते की, माझे भारतात प्रत्यार्पण केले गेल्यास माझा छळ होऊ शकतो. मी भारतात राहू शकणार नाही. मी पाकिस्तानी वंशाचा आहे. मुस्लीम आहे. त्यामुळे भारतात माझा अधिक छळ होऊ शकतो. तहव्वूर राणा याने त्यासाठी ह्यूमन राइट्स वॉच 2023 मधील अहवालाचा हवाला दिला. त्याने म्हटले की, त्या अहवालानुसार, भारतातील भाजप सरकार अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिमांसंदर्भात भेदभाव करत आहे.
तहव्बूर राणा याने याचिकेत म्हटले की, भारत सरकार हुकुमशाहसारखे वागत आहे. त्यामुळे माझे प्रत्यार्पण झाल्यावर माझा झळ होईल, हे निश्चित आहे. तसेच मला अनेक आजार आहेत. पार्किंसन्ससारखाही आजारही मला आहे. त्यामुळे मला राष्ट्रीय, धार्मिक, सांस्कृतिक त्रास होईल, त्या ठिकाणी पाठवू नये.
तहव्वूर राणा याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. त्याचे शिक्षण आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये झाले. तो पाकिस्तानच्या आर्मीत दहा वर्षांपर्यंत डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याने ती नोकरी सोडली. तो भारताच्या विरोधात सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. तो आता कॅनडाचा नागरिक आहे. परंतु सध्या शिकागोमध्ये राहत आहे. त्या ठिकाणी त्याने व्यवसाय सुरु केला आहे.
तहव्वूर राणा याने कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लंडचा दौरा केला. त्याला सात भाषा येतात. न्यायालयीन कागदपत्रानुसार 2006 पासून नोव्हेंबर 2008 पर्यंत तहव्वुर राणाने पाकिस्तानमध्ये डेव्हिड हेडली आणि दुसऱ्या लोकांसोबत मुंबई हल्ल्याचा कट रचला. त्यासाठी त्याने अतिरिकी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि हरकत उल जिहाद ए इस्लामीला मदत केली.