
गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. अशातच आता युक्रेनच्या शेजारील देश पोलंडमध्येही रशियन ड्रोनने प्रवेश केला आहे. त्यामुळे पोलंडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलंडमधीललुब्लिन विमानतळ तात्काळ बंद करण्यात आले असून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संशयास्पद ड्रोन हालचाली दिसताच पोलंडने आपली लढाऊ विमाने सीमेवर तैनात केली आहेत. तसेच जमिनीवरील हवाई संरक्षण युनिट्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलंड रशियावर हल्ला तर करणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गेल्या काही दिवसांपासून रशियन ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यानंतर आता पोलंडने संभाव्य धोका ओळखून सीमावर्ती भागात सैन्य तैणात केले आहे. सुरक्षा संस्था आणखी सतर्क झाल्या आहेत. पोलंड आणि मित्र देशांची विमाने हवाई हद्दीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या हवाई संरक्षण यंत्रणेला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रशियन ड्रोन पोलंडमध्ये शिरले होते. यावर बोलताना युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मोठं विधान केलं होतं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पोलंडशी युद्ध पुकारले आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच झेलेन्स्की यांनी युरोपीय देशांना इशारा दिला होता की, ‘रशियन ड्रोन खूप लांबपर्यंत प्रवास करु शकतात. त्यांना हा प्रकार थांबवायला सांगा आणि रशियावर कठोर निर्बंध लादा.’
रशियन ड्रोन बाबत पोलिश सैन्याने एक निवेदन जारी करून महत्त्वाची माहिती दिली आहे. सैन्याने म्हटले की, ‘युक्रेनच्या सीमेवरील भागात संभाव्य ड्रोन हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. जमिनीवरील हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली सज्ज आहे.