कोण आहेत कमला प्रसाद-बिसेसर? त्रिनिदादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला विशेष उल्लेख

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकसंख्येपैकी सुमारे ४० टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. त्या ठिकाणी भारतीय वंशाचे ५,५६,८०० लोक आहेत. कमला प्रसाद बिसेसर या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सध्याच्या पंतप्रधान आहेत.

कोण आहेत कमला प्रसाद-बिसेसर? त्रिनिदादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला विशेष उल्लेख
कमला प्रसाद बिसेसर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले
| Updated on: Jul 04, 2025 | 11:21 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र दौऱ्यावर आहे. घाना येथील दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये पोहचले. त्या ठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी कमला प्रसाद-बिसेसर यांचा भारताशी संबंधित खास उल्लेख केला. ते ऐकूण त्या ठिकाणी असलेल्या सर्व भारतीय वंशाच्या लोकांचे चेहरे अभिमानाने उजळले.

काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कमला बिसेसर या ‘बिहारची बेटी’ आहेत. त्यांचे पूर्वज बक्सर (बिहार) येथील होते. त्या स्वतःही तिथे राहिल्या आहेत. लोक त्यांना बिहारची मुलगी म्हणतात. बिहारचा वारसा हा केवळ भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा वारसा आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये पटना, बनारस, दिल्ली आणि कोलकाता सारख्या शहरांची नावे तिथल्या रस्त्यांवरही आढळतात हे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच त्रिनिदादमध्ये नवरात्र, महाशिवरात्री आणि जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, त्याचा उल्लेखही त्यांनी केला.

कोण आहेत कमला बिसेसर?

कमला प्रसाद बिसेसर या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सध्याच्या पंतप्रधान आहेत. एप्रिल २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड विजय मिळवला. त्यानंतर १ मे रोजी पुन्हा त्यांनी पदभार स्वीकारला. हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. त्या फक्त पंतप्रधान नाही तर देशाच्या पहिल्या महिला अॅटर्नी जनरल, विरोधी पक्षनेत्या आणि राष्ट्रकुल देशांच्या पहिल्या महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्या २०१० पासून युनायटेड नॅशनल काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि १९९५ पासून सिपारिया मतदारसंघाच्या खासदार आहेत.

भारत आणि दक्षिण आशियाबाहेरील देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. एप्रिल २०२५ मध्ये यूएनसी युतीने ४१ पैकी २६ जागा जिंकून त्या पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण, सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार सुधारण्याचे आणि सरकारी तेल कंपनी पेट्रोट्रिनचे पुनरुज्जीवन करण्याचे वचन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राजकारणात महिला शक्तीचे एक नवे युग सुरू झाले आहे.

त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये किती आहेत भारतीय ?

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकसंख्येपैकी सुमारे ४० टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. त्या ठिकाणी भारतीय वंशाचे ५,५६,८०० लोक आहेत. त्यापैकी फक्त १,८०० अनिवासी भारतीय आहेत. उर्वरित लोक त्या देशाचे नागरिक आहेत. ज्यांचे पूर्वज १८४५ ते १९१७ दरम्यान कामगार म्हणून तेथे गेले होते.