चोरीच्या नादात बाळाला दुकानातच विसरली, अशी पकडली चोरी...

सीसीटीव्ही फूटेज बघताना एक महिला बाळ दुकानात विसरुन गेल्याचं कर्मचाऱ्यांना दिसलं. मात्र त्याच महिलेने दुकानातून बाबागाडी चोरल्याचं समजल्याने कर्मचारी आश्चर्यचकित झाले.

चोरीच्या नादात बाळाला दुकानातच विसरली, अशी पकडली चोरी...

न्यूजर्सी : बाबागाडी (Stroller) चोरण्याच्या नादात अमेरिकेतील एक महिला इतकं भान हरपून बसली, की स्वतःच्या चिमुकल्या बाळालाच ती दुकानात विसरुन आली. बाळाला आणण्यासाठी दुकानात परत गेली असताना भांडं फुटलं आणि ती पकडली गेली. पोलिसांनी वीस आणि 23 वर्षांच्या दोन महिला आरोपींना अटक केली आहे.

न्यूजर्सी (New Jersey) मधील बॅम्बी बेबी स्टोअरमधून (Bambi Baby Store) बाबागाडी चोरण्यासाठी तीन महिला ग्राहक म्हणून गेल्या होत्या. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यांनी सोबत तीन चिमुकल्यांना घेतलं. दोघींनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवायचं आणि तिसरीने बाबागाडी पळवायची, असा प्लॅन ठरला.

योजनेनुसार, तिन्ही चोरट्या महिलांनी आपल्या चिमुकल्यांसह दुकानात प्रवेश केला. दोघींनी दुकानदारांना बोलण्यात गुंडाळलं. ही संधी साधून तिसऱ्या महिलेने बाबागाडी लांबवली आणि दुकानातून पोबारा केला. मात्र सोबत आणलेलं मूल नेण्यास ती विसरली.

आपली सहकारी बाबागाडी चोरुन बाहेर पडली आहे, याची खात्री पटताच दोन्ही महिलांनी आपापल्या लेकरांसह काढता पाय घेतला. मात्र आपल्या सहकारी चोरटीचं बाळ दुकानातच राहिलं आहे, याकडे त्यांचंही लक्ष गेलं नाही.

दुकान रिकामं झाल्यावर एक बाळ राहिल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बाळाकडे धाव घेतली, आणि ते कोणाचं असेल, याचा तर्क लढवण्याचा प्रयत्न केला. बाळाला बोलता येत नसल्याने सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर दुकानातल्या सीसीटीव्हीच्या मदतीने बाळाच्या पालकांचा माग काढायचं ठरलं.

सीसीटीव्ही फूटेज बघताना एक महिला त्या बाळासोबत आत आल्याचं कर्मचाऱ्यांना दिसलं. त्यामुळे ‘बाळाची आई सापडली’ याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. मात्र हा आनंद क्षणभंगुर निघाला, कारण पुढच्याच मिनिटाला त्या महिलेचा कारनामाही उघड झाला.

आता बाळाला त्याच्या आईपर्यंत पोहचवण्याची काळजी कर्मचाऱ्यांना घ्यायची नव्हती. कारण आईच त्याला शोधत परत येणार, याची त्यांना खात्री होती. त्यांच्या अंदाजानुसार महिला बाळाचा शोध घेत दुकानात परत आली आणि अलगद दुकानदाराच्या जाळ्यात सापडली.

दुकानाच्या मालकीणीने सीसीटीव्ही फूटेज फेसबुकवर शेअर केलं आहे. महिलेने चोरलेली बाबागाडी तुलनेने स्वस्त होती, असं ती सांगते. त्या बाबागाडीची किंमत होती तीनशे डॉलर (भारतीयांसाठी 21 हजार रुपये). मात्र त्याच्या बाजूचीच बाबागाडी प्रचंड महाग होती. कारण तिचा दर होता एक हजार डॉलर (तब्बल 72 हजार रुपये)

आर्थिक परिस्थितीमुळे चोरी करणं मी समजू शकते, मात्र आपल्या तान्ह्या बाळाला या गुन्ह्यात सामील करुन घेऊ नका, असं आवाहन दुकानाच्या मालकीणीने केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *