सोन्याची 52 जहाजं, 38 विमान, 300 सुपरकार आणि प्रभू श्रीरामाशी जोडले नाव, कोणत्या देशात राहतो जगातील सर्वात श्रीमंत राजा?
World Richest King : एखाद्या परिकथेला शोभेल असे जीवन जगणारा जगातील सर्वात श्रीमंत राजा कुठे राहतो हे तु्म्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे त्याच्या अनेक पिढ्यांचे नाव प्रभू श्रीरामाच्या नावाशी जोडलेले आहे. त्यांच्या नावात राम हे नाव असतेच.

Maha Vajiralongkorn of Thailand: ‘रामायण’ हा चित्रपट संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. अनेक देशांमध्ये तो सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. त्यात थायलंडही मागे नाही. या देशाला प्राचीन काळात सियाम म्हणून ओळखले जायचे. थायलंड आणि भारताचे प्राचीन काळापासून अत्यंत जवळचे धार्मिक आणि सांस्कृतिक ऋणानुबंध आहेत. या देशातील बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत. पण येथे रामायणाला राष्ट्रीय महाकाव्याचा दर्जा आहे. या देशाची संस्कृती, कला आणि साहित्यावर या महाकाव्याचा मोठा प्रभाव आहे.
थायलंडच्या राजाला ‘राम’ ही पदवी
थायलंडमध्ये रामायणाला रामाकियन (Ramakien) म्हटलं जाते. येथील राजाला ‘राम’ ही पदवी दिली जाते. थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न हे आहेत. त्यांना दहावे राम या नावाने (Rama X) या नावानेही ओळखले जाते. ते जगातील सर्वात श्रीमंत राजे आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 43 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांना ही संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे. 2016 मध्ये त्यांचे वडील राजा भूमिगोल अदुल्यादेज यांच्या निधनानंतर ते सिंहासनावर विराजमान झाले. ते चक्री या राजवंशाचे दहावे राजे आहेत.
‘राम’ पदवीची परंपरा
थायलंडमध्ये चक्री राजवंश हा 1782 मध्ये सत्तेवर आला होता. या राजवंशाचे सहावे शासक राजा वजिरावुध यांनी त्यांच्या नावामागे राम ही पदवी धारण करण्यास सुरुवात केली होती. पाश्चात्य देशांमध्ये थाई नावांचा उच्चार करणे कठीण जाते. तसेच वजिरावुध हे पश्चिमेकडील क्रमांकांच्या व्यवस्थेने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नावामागे राम ही पदवी लावण्यास सुरूवात केली. स्वतःला सहावे राम (Rama VI) असे त्यांनी जाहीर केले. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
राजघराण्याकडे मोठी संपत्ती
वजिरालोंगकोर्न यांच्याकडे राजधानी बँकॉक येथे 17,000 हून अधिक मालमत्ता आहेत. यामध्ये अनेक व्यावसायिक मालमत्ता, हॉटेल्स आणि शाही राजवाड्यांचा समावेश आहे. त्यातून राजघराण्याची मोठी कमाई होते. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांच्याकडे 300 हून अधिक महागड्या कार आहेत. यामध्ये क्लासिक रोल्स रॉयपासून सुपर कार्सनपर्यंतचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे 38 विमानं आणि हेलिकॉप्टर्सही आहेत. त्यातील बहुतांश विमाने त्यांच्यासाठी खास रचना केलेली आहेत. थायलंडच्या राजाकडे 52 सोन्याची जहाजं (Golden Boats) सुद्धा आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत राजे
ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे 30 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहेत. सौदी अरेबियाचे शासक सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांची संपत्ती 21 अब्ज डॉलर इतकी आहे. युएई, लक्झेंबर्ग, मोरोक्को, स्पेन, कतार आणि मोनॅकोचे राजेही जगातील सर्वात श्रीमंत राज्यकर्त्यांमध्ये समाविष्ट आहेत. ब्रिटनचे राजे चार्ल्स हे मात्र जगातील सर्वात श्रीमंत राजांच्या यादीत नाहीत.