साखरेचे दर वाढताच डी-मार्टचा मोठा निर्णय, नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

सध्या साखरेचे दर वाढल्याने सर्व सामान्य ग्राहकांनी याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. अशातच आता वाढत्या दरामुळे डी-मार्टने देखील मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय?

साखरेचे दर वाढताच डी-मार्टचा मोठा निर्णय, नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
| Updated on: Aug 25, 2026 | 5:17 PM

ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. देशात साखरेचे दर अचानक झपाट्याने वाढले असून, 20 जुलै रोजी सरासरी किरकोळ दर 48.18 रुपये किलो होता, तो 20 ऑगस्टपर्यंत 55.70 रुपये किलोवर पोहोचला. सरकारने या दरवाढीमागे कमी उत्पादन, वाढती सणासुदीची मागणी, हवामानाचा परिणाम, जागतिक पुरवठ्यातील घट तसेच साठेबाजी यांसारख्या कारणांचा उल्लेख केला आहे.

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तुलनेने स्वस्त दरात साखर मिळावी म्हणून अनेक ग्राहक डी-मार्टसारख्या किरकोळ विक्री केंद्रांकडे वळताना दिसत आहेत. काही ठिकाणी वाढलेल्या मागणीमुळे साखरेचा साठा कमी पडल्याचे चित्रही अनेक डी-मार्ट स्टोअरमध्ये दिसून आले आहे. डी-मार्टच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काही साखरेची उत्पादने सध्या ‘आऊट ऑफ स्टॉक’ असल्याचे दिसत आहे.

Loading...

डी-मार्टमधील व्हिडीओ व्हायरल

ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात साखर खरेदी होऊ लागल्याने काही स्टोअर्समध्ये प्रति ग्राहक खरेदीवर मर्यादा लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही डी-मार्ट स्टोअरमध्ये एका ग्राहकाला ठरावीक प्रमाणातच साखर खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, ही मर्यादा सर्व डी-मार्ट स्टोअर्समध्ये समान आहे, असे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

मात्र, काही डी-मार्टमध्ये एका ग्राहकाला 5 किलो साखर खरेदी करता येईल अशी देखील सूचना देण्यात आली आहे. यामुळे अनेक ग्राहकांनी यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर काही ठिकाणी डी-मार्टमध्ये साखरच नसल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे.

किती किलो साखरेचा स्टॉक ठेवता येणार?

दरम्यान, वाढत्या साखरेच्या किंमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनेही साखरेच्या साठ्यावर निर्बंध लावले आहेत. 1 ऑगस्टपासून साखर व्यापाऱ्यांसाठी 400 टनांची स्टॉक लिमिट लागू करण्यात आली आहे. तसेच 1 सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा अधिक साठा ठेवता येणार नाही. सरकारने देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीलाही परवानगी दिली आहे.

साखरेच्या दरवाढीमुळे चहा, मिठाई, बेकरी पदार्थ आणि रोजच्या स्वयंपाकातील खर्चावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेचे दर स्थिर होतात का आणि बाजारातील पुरवठा सुरळीत होतो का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us