वर्धा नदीत चार वर्षीय चिमुकला वाहून गेला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

वर्धा : मालवाहू आणि दुचाकीच्या अपघातात नदीत पडून एक चिमुकला वाहून गेला. वर्धा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. अमरावतीतील कौंडण्यपूर आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील पुलावर गुरुवारी सायंकाळी मालवाहू आणि दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. ही धडक इकती जोरदार होती की, दुचाकीवरील महिला आणि चार वर्षाचा चिमुकला नदीत पडला. यानंतर स्थानिकांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश […]

वर्धा नदीत चार वर्षीय चिमुकला वाहून गेला
Follow us on

वर्धा : मालवाहू आणि दुचाकीच्या अपघातात नदीत पडून एक चिमुकला वाहून गेला. वर्धा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. अमरावतीतील कौंडण्यपूर आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील पुलावर गुरुवारी सायंकाळी मालवाहू आणि दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. ही धडक इकती जोरदार होती की, दुचाकीवरील महिला आणि चार वर्षाचा चिमुकला नदीत पडला. यानंतर स्थानिकांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले, मात्र चार वर्षीय मुलगा अद्यापही बेपत्ता आहे.

चांदूर रेल्वेच्या राहणाऱ्या विभा दिवाकर राजूरकर या आपल्या दोन जुळ्या मुलांना विराज आणि स्वराजला घेऊन भाऊ निलेश रमेश डहाकेसोबत दुचाकीवर वर्धा नदी पात्रावरील पुलावरुन जात होत्या. यावेळी अमरावतीहून येत असलेल्या भरधाव मालवाहू वाहनाने समोरुन यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये निलेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी पुलाच्या कडेला असलेल्या कठड्यांना जाऊन आदळली. यामुळे मागे बसलेल्या विभा आणि स्वराज हे नदीत पडले. यानंतर स्थानिकांनी विभा यांना नावेच्या मदतीने वाचवले, मात्र चार वर्षीय चिमुकला स्वराज हा पाण्यात वाहून गेला. स्वराजच्या शोधात शोधमोहिम राबवण्यात आली. मात्र, बराच वेळ शोध घेतल्यावरही स्वराज सापडला नाही. अखेर अंधार पडल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली. उद्या सकाळी पुन्हा स्वराजचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती आर्वीचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली.

या अपघातात मालवाहू चालकही जखमी झाला आहे. अपघातातील सर्व जखमींवर आर्वी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली असून मालवाहू चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.