माझं काम पाहिल्यानंतर ट्रोल करणारेच कौतुक करतील, ट्रोलर्सना रोहित पवारांचा टोला

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बारामती : “अलीकडच्या काळात पेड ट्रोलर्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे मी विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केल्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं. पण, असं असलं तरी मला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे लक्ष देऊन मी माझ्या चांगल्या कामात बाधा आणणार नाही”, असं शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच, […]

माझं काम पाहिल्यानंतर ट्रोल करणारेच कौतुक करतील, ट्रोलर्सना रोहित पवारांचा टोला
Follow us on

बारामती : “अलीकडच्या काळात पेड ट्रोलर्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे मी विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केल्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं. पण, असं असलं तरी मला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे लक्ष देऊन मी माझ्या चांगल्या कामात बाधा आणणार नाही”, असं शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच, जे आता मला ट्रोल करत आहेत, तेच पुढे माझं काम बघून कौतुक करतील, असा टोलाही रोहित पवार यांनी ट्रोलर्सला लगावलाय.

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छूक असल्याचं सांगत, वरिष्ठ सांगतील त्या ठिकाणाहून मी निवडणूक लढवेल असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रोहित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीची चांगलीच तयारी केल्याचं दिसतं आहे. बारामतीत आज ‘वॉटर कप’ स्पर्धेनिमित्त अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेने महाश्रमदान सोहळा आयोजित केला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी आपली विधानसभा निवडणुकीविषयीची भूमिका स्पष्ट केली.

वरिष्ठ नेते कोणता मतदारसंघ द्यायचा याचा निर्णय घेतील. त्या अनुषंगाने मी त्या भागात चांगलं काम करेल. त्यामुळे वरिष्ठ आपल्याला संधी देतील तिथून आपण निवडणूक लढवणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्यामुळे अन्य कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “माझ्याजागी कुणालाही संधी मिळाली, तरी आपण त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करु असंही  रोहित पवार यांनी सांगितलं.

पुण्यात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियातून रोहित पवार यांना ट्रोल करण्यात आलं. यावरील प्रश्नावर रोहित पवार यांनी उत्तर देत ट्रोलर्सना टोला लगावला. “मी सामाजिक काम करत असून मला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे.  स्वतःच्या कामावर विश्वास असल्याने कुणी आपल्याला ट्रोल करत असेल तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही. अलीकडच्या काळात पेड ट्रोलर्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे मी विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचं जाहीर केल्यानंतर मला ट्रोल केलं गेलं. त्यामुळे ट्रॉलर्सकडे लक्ष देऊन मी माझ्या चांगल्या कामात बाधा आणणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

“पवार कुटुंबाचं काम आज सर्वश्रुत आहे. आमच्या कुटुंबाला सामाजिक वारसा आहे. शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित व्यवसायांमुळे तिथल्या प्रत्येक प्रश्नांची जाण आम्हाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्यात गैर काय?”, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. “आज ट्रोल करणारे उद्या माझं काम पाहून कौतुक करतील”, असा टोला रोहित पवार यांनी ट्रोलर्सला लगावला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देत राजकारणात सक्रिय करण्यात आलं. त्यापूर्वी रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री घेतली. मागील वर्षभरापासून रोहित पवार यांनी हडपसर आणि कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघात विशेष लक्ष घातलं. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे रोहित पवार यांनी विधानसभेसाठी पूर्ण तयारी केल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघातून संधी मिळते, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

रोहित पवारांची कर्जत-जामखेड मतदारसंघात पाय रोवण्यास सुरुवात

पवारांचा आणखी एक नातू रणांगणात, रोहित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं!

बारामतीत पवार कुटुंबाची धाकधूक वाढवण्यात भाजपला यश?

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मतदानानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया