साईबाबा जन्मस्थळ वादावर अजित पवार म्हणतात…

| Updated on: Jan 19, 2020 | 2:05 PM

शिर्डीमधील सर्व दूकान, हॉटेल, लॉज बंद आहेत. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शिर्डीकरांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

साईबाबा जन्मस्थळ वादावर अजित पवार म्हणतात...
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान’ असा उल्लेख केल्यामुळे शिर्डीकरांच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घ्यावे यासाठी शिर्डीकरांनी बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासून शिर्डीत बंद पाळला जात आहे. शिर्डीमधील सर्व दूकान, हॉटेल, लॉज बंद आहेत. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील शिर्डीकरांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

“साईबाबांच्या जन्मस्थान वादावर मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाथरी आणि शिर्डीच्या नागरिकांना कोणाच्याही भावना न दुखवता चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. मुख्यंत्र्यांप्रमाणे मी देखील सर्वांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करतोय. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेतील. मुख्यमंत्री या बैठकीत पाथरी आणि शिर्डीच्या लोकांचे म्हणणं ऐकूण त्यावर योग्य निर्णय घेतील”, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

शिर्डीच्या धर्तीवर पाथरीचा साईबाबा जन्मस्थान म्हणून विकास करण्याला शिर्डीकरांचा विरोध आहे. त्यासाठीच हा बेमुदत बंद आहे. शिर्डीत रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. शनिवारी (18 जानेवारी) शिर्डीत ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांनी शिर्डी बंदची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंदचं आवाहन शिर्डीवासीयांनी केलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याविषयावर आक्रमक पवित्रा घेतला. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं विधान तात्काळ मागे घ्यावं, अशी मागणी राधाकृष्ण विखेंनी केली.