‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण

| Updated on: Nov 16, 2020 | 9:05 AM

आज अनेक मंदिरं भक्तांसाठी उघडण्यात आली. पण अशात काही मंदिरं अजूनही न उघडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

या दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण
Follow us on

कोल्हापूर : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे तब्बल 9 महिन्यांनी आज महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. यामुळे आज अनेक मंदिरं भक्तांसाठी उघडण्यात आली. पण अशात काही मंदिरं अजूनही न उघडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. कोरोना काळात भक्तांना दर्शन देण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यासाठी या मंदिरांनी आणखी एक दिवस वेळ घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर आजपासून उघडण्यात येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाबाईचं मंदिर हे उद्यापासून म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे. यासाठी सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत रांगेतून दर्शन घेता येणार आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजातून आत जाण्याची आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तर देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाइन बुकिंगचीदेखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी-कुंकू, खण, नारळ, ओटी, फुल आदी देवीला वाहण्यावर बंदी आहे. त्यामुळे कुणीही या वस्तू आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बुलढाण्यातील शेगांवचं गजानन महाराज मंदिरदेखील आज उघडणार नाही आहे. श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी उद्या 17 नोव्हेंबरला मंगळवारी उघडण्यात येणार आहे. यासंबंधिचा निर्णय आज मंदिर प्रशासनाकडून देण्यात आला आहे तर दर्शनासाठी ई-पास घ्यावी लागणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

चर्चही बंद
दरम्यान, राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी वसई-विरारमधील चर्च मात्र आजपासून खुली होणार नाहीत. स्थानिक प्रशासनाचा लेखी आदेश जोपर्यंत प्राप्त होतं नाही तोपर्यंत चर्च सर्वसामन्यायासाठी खुली होणार नाहीत असं चर्चकड़ून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या – 

महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे 9 महिन्यांनी उघडले, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

राज्यातील मंदिरं सोमवारपासून सुरु होणार, पण सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकेश्वर मंदिबाबात अद्यापही संभ्रम!

(Ambabai temple and Gajanan Maharaj temple in Shegaon will not opene from today)