अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची हत्या, सांगली पोलिसांची पाच पथकं शोधकार्यात

| Updated on: Feb 03, 2020 | 3:58 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आनंदराव पाटील (Sangli Anandrao Patil Murder) यांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची हत्या, सांगली पोलिसांची पाच पथकं शोधकार्यात
Follow us on

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आनंदराव पाटील (Sangli Anandrao Patil Murder) यांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.  या हत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून, आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आनंदरराव पाटील यांची काल सांगलीतील खटाव परिसरात हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे सांगली जिल्हा (Sangli Anandrao Patil Murder) हादरुन गेला आहे.

आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत. आनंद पाटील हे पलूस तालुक्यातील खटाव गावापासून काही अंतरावर ब्रह्मनाळ गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. काम आटोपून काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना, वाटेत दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. पाटील यांना रक्तबंबाळ करुन हल्लेखोर पळून गेले. आनंदराव पाटील यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

या हल्ल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.  त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच भिलवडी पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला. घटनास्थळावरुन कोयता आणि हल्ल्यात वापरेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. तर घटनास्थळावरुन आनंदराव पाटील यांची मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

आनंदराव पाटील यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन रात्री खटाव गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या भिलवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोण आहेत आनंदराव पाटील?

गेल्या तीस वर्षापासून आनंदराव पाटील हे राजकारणात सक्रिय होते. आर आर पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. आनंदराव पाटील हे 10 वर्ष खटाव गावचे सरपंच होते. तासगाव मार्केट कमिटीचेही ते संचालक होते.

तासगावमधील रामानंद भारती सूत गिरणीचे ते विद्यमान संचालक होते. तासगाव आणि पलूस परिसरात  राजकीय क्षेत्रात आनंदराव पाटील यांचा दबदबा होता.

 तपासासाठी पाच पथकं

या हत्याकाडांचा तपास सांगली पोलिसांच्या पाच टीमद्वारे सुरु आहे. यामध्ये सांगली पोलिसांचे सायबर क्राईम ब्रांच, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, भिलवडी पोलीस, डीवायएसपी यांचे पथक, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, या खुनाचा तपास करीत आहेत. तर तपासासाठी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  लवकरच ठोस अशी माहिती आम्हाला मिळेल, प्राथमिक माहितीनुसार खुनाचे कारण हे राजकीय नाही अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

संबंधित बातम्या 

अजित पवारांच्या सचिवाच्या भावावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर पसार