अमेरिकेत कृषी कायद्यांविरोधात आक्रमक निदर्शने; खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

| Updated on: Dec 13, 2020 | 8:27 AM

भारताकडून या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. | Farmers protest

अमेरिकेत कृषी कायद्यांविरोधात आक्रमक निदर्शने; खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
Follow us on

वॉशिंग्टन: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात अमेरिकेत शनिवारी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी खलिस्तानी (Khalistani) समर्थकांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी (MahatmaGandhi) यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यावेळी खलिस्तानचे झेंडेही फडकण्यात आले. या आंदोलकांकडून पुतळ्याच्या चेहऱ्यावर खलिस्तानचा झेंडा गुंडाळण्यात आला. वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाबाहेर हा सारा प्रकार घडला. (deface Mahatma Gandhi statue in Washington)

काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांकडून अशाचप्रकारची निदर्शने करण्यात आली होती. तेव्हादेखील खलिस्तानवाद्यांकडून मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. मात्र, आता खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

भारताकडून या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भारतीय दूतावासाकडून अमेरिकी सुरक्षा यंत्रणांकडे यासंदर्भात तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. अमेरिकी यंत्रणांनी तातडीने हालचाली करुन दोषींवत कारवाई करावी, अशी मागणी भारतीय दूतावासाकडून करण्यात आली आहे.

‘खलिस्तानी समर्थकांकडून कृत्याचे समर्थन’

प्रत्येक व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. भारतीय सरकार आणि प्रसारमाध्यमे अनेक वर्षांपासून खलिस्तान समर्थकांचे नकारात्मक चित्र रंगवण्यात आले आहे. अमेरिकेतही टेक्सास राज्याकडून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, त्यामुळेच टेक्सासवर लगेच दोषारोप होत नाही. स्वतंत्र खलिस्तानची मागणी का होत आहे, हा विचार भारतीय सरकारने आपल्या जनतेला विचारावा, असे एका खलिस्तान समर्थकाने सांगितले.

अमेरिकेत यापूर्वीही आंदोलनांमध्ये पुतळ्यांची विटंबना करून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे महात्मा गांधींजींच्या पुतळ्यासोबत जे झाले त्यामध्ये काहीही वावगे नाही, असे या आंदोलकांकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारला मोठे यश, चिल्ला सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

गेल्या 12 दिवसांपासून चिल्ला सीमेवर सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. काही शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत दिल्ली-नोएडा सीमा खुली केली.

शेतकऱ्यांच्या आडून काँग्रेस आणि डाव्यांचे आंदोलन- साध्वी प्रज्ञा

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शेतकरी आंदोलनाच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. शेतकऱ्यांच्या वेषात लपून काँग्रेस आणि डाव्यांकडून हे आंदोलन केले जात आहे. कृषी कायद्यांविरोधात संभ्रम पसरवला जात आहे, असा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.

(deface Mahatma Gandhi statue in Washington)