नांदेड कौठ्यात 30 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार : अशोक चव्हाण

| Updated on: Oct 05, 2020 | 8:59 PM

नांदेड कौठा येथे 30 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याची महत्त्वाची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केलीये.

नांदेड कौठ्यात 30 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार : अशोक चव्हाण
Follow us on

नांदेड : जिल्ह्यातून विविध क्रीडा प्रकार, खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी त्यांना चांगल्या क्रीडा संकुलाची आवश्यकता आहे. त्यासाठी कौठा येथे 30 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जाहीर केला. (Ashok Chavan Announcement In nanded kautha 30 Acres Land on Stadium)

क्रीडा संकुल विकासाबाबत आज नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार उपस्थित होते.

नांदेडमध्ये विविध खेळांसाठी एक अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल असावे अशी अनेक दिवसांपासून विविध क्रीडा संघटना, खेळाडू, क्रीडाप्रेंमीची मागणी होती. ही मागणी विचारात घेऊन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्णय घेतला.

सद्यस्थितीत नांदेड शहरात अद्ययावत क्रिकेटच्या स्टेडिअमचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. क्रिकेटसमवेत इतर खेळांच्या विविध स्पर्धा व सरावासाठी स्वतंत्र जिल्हास्तरावरील नवीन स्टेडिअम जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना नवी दिशा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन कौठा येथे तीस एकर जागेमध्ये आता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आकार घेईल. यात सिन्थेटिक ॲथलेटिक्स मैदान, स्विमिंगपूल, बॅटमिंटन हॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, जिमनॅस्टिकसाठी हॉल, ज्यूदो कराटे, पॉवर लिफ्टींग, बास्केट बॉल, स्केटिंग, आर्चरी, तॉयक्कोंदो, कुस्ती अशा विविध खेळांचे अद्ययावत व प्रमाणित आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असतील.

याचबरोबर क्रीडापटूंच्या अंगी आंतराष्ट्रीय दर्जाचे कसब यावे यादृष्टिने नियमित सराव शिबीर स्पर्धा घेण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सेवासुविधांचाही समावेश राहील.

नवीन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील क्रीडा विकासाबाबत आता स्वतंत्र समिती तयार करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध अध्यक्षपदी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती केली. सदर तीस एकर जागा या नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलासाठी तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत योग्यती प्रक्रिया करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.

(Ashok Chavan Announcement In nanded kautha 30 Acres Land on Stadium)

संबंधित बातम्या

कृषी कायदा मागे घेण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन

मराठा आरक्षण कुणाला नकोय?; ‘त्या’ नेत्यांची नावं सांगा; अशोक चव्हाणांचं चंद्रकांतदादांना आव्हान

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज : अशोक चव्हाण