‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा’, स्वाभिमानी युवती आघाडीचा रास्तारोको

| Updated on: Oct 16, 2020 | 10:04 AM

मराठवाड्यात परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्वाभीमानी युवती आघाडीची मागणी

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, स्वाभिमानी युवती आघाडीचा रास्तारोको
Follow us on

बीड: परतीच्या पावसामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीकडून करण्यात आली आहे. स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रास्तारोको करण्यात आला. ‘मुख्यमंत्री जागे व्हा, मुख्यमंत्री न्याय द्या’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच सरसकट पीकविमा द्या अशी मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी मागणी मान्य न झाल्यास ज्याप्रमाणे पावसानं शेतकऱ्यांना झोडपलं, तसंच सरकारलाही झोडपू, असा इशारा यावेळी स्वाभिमानी युवती आघाडीनं दिला आहे. (swabhimani yuvati aaghadi agitation against government)

मराठवाड्यात परतीच्या पावसाचा तडाखा

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान केलं. कुठे काढणी झालेल्या सोयाबीनच्या हुंडी वाहून गेल्या. तर कुठे सोयाबीनला जागेवरच बुरशी लागली. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं उभा ऊस आडवा झाला. फुलं, फळबागांचं मोठं नुकसान झालं. भात शेती पुर्णता नष्ट झाली. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर वाया गेललं पीक पाहत अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचं विरोधकांचं आवाहन

‘मुख्यमंत्री महोदय घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता अतिवृष्टीमुळं झालेलं शेतकऱ्यांचे हाल ‘ऑनलाईन’ बघता येणार नाहीत. थेट बांधावर जाऊन अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या. अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल’ अशा शब्दात बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचंही मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यात केलेल्या दौऱ्यावेळी निदर्शनास आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्याबाबत तातडीनं कारवाई करा आणि शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करुन द्या, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्रीजी घर सोडा, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल, बाळा नांदगावकरांचं टीकास्त्र

शनिवारपर्यंत राज्यावर असणार आसमानी संकट, हवामान खात्याचा इशारा

swabhimani yuvati aaghadi agitation against government