केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी आपातकालीन बैठक बोलावली होती. | CM Arvind Kejriwal

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री
| Updated on: Nov 05, 2020 | 7:51 PM

नवी दिल्ली: राज्यातील वाढत्या वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने दिल्लीत फटाक्यांवर कडक बंदी (ban on firecrackers) घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात दिल्लीत फटाके वाजवण्यास बंदी असेल. यंदा या बंदीतून पर्यावरणपूरक फटाक्यांनाही वगळण्यात आलेले नाही. (Delhi govt ban on firecrackers between 7th Nov to 30th November)

एरवीही दिल्लीत हिवाळ्याच्या काळात वायू प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरुप धारण करते. यंदा त्यामध्ये कोरोनाच्या संकटाची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. सध्याच्या घडीला राज्यात प्रत्येक दिवशी कोरोनाचे सहा हजार नवे रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी आपातकालीन बैठक बोलावली होती. यामध्ये कोरोना आणि वायू प्रदुषणाच्या समस्येवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

त्यानुसार आता दिल्लीत फटाके वाजवण्यावर बंदी असेल. तसेच दिल्लीच्या परिसरात फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा केजरीवाल यांनी दिला. तसेच दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयांतील ICU खाटांची संख्या वाढवली जाणार आहे.

महाराष्ट्रातही फटाकेमुक्त दिवाळीची शक्यता

दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या राज्यात दिवाळीत फाटके फोडण्यास बंदी घातली आहे. थंडीच्या वातावरणात फटाक्याच्या प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या राज्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेनेही यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

आज सकाळीच डेथ ऑडिट कमिटी आणि टास्क फोर्सशी बोलणं झालं. त्यांनीही थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास मज्जाव करण्याचा सल्ला दिला आहे. फटाक्यांचा धूर हवेत फार वरपर्यंत जात नाही. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा विषय चर्चेसाठी आला होता. त्यातही मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचं फटाके विरहित दिवाळी साजरी केली जावी असं म्हणणं पडलं. त्यामुळे राज्यातील जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

(Delhi govt ban on firecrackers between 7th Nov to 30th November)