उद्धव ठाकरे परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत, पंकजा मुंडेंकडून ‘मोठ्या भावा’वर स्तुतिसुमनं

| Updated on: Apr 10, 2020 | 4:41 PM

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे वेगळे दिसत आहेत. अगदी पेहरावाबाबतही. लोकांच्या मनात जी नेत्याबद्दल प्रतिमा असते त्यापेक्षा ते वेगळे आहेत, असंही पंकजा म्हणतात. (Pankaja Munde Praises CM Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत, पंकजा मुंडेंकडून मोठ्या भावावर स्तुतिसुमनं
Follow us on

मुंबई : वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यास मदत केल्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारवर टीका करत असतानाच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत आहेत, अशा शब्दात ‘बहीण’ पंकजा यांनी ‘मोठ्या भावा’ला शुभेच्छा दिल्या आहेत. (Pankaja Munde Praises CM Uddhav Thackeray)

‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देते. सध्याची ‘कोरोना’ची परिस्थिती ते व्यवस्थितपणे हाताळत आहेत, असं मला वाटतं. मी त्यांच्यावर टीका करणार नाही, तसं वाटलं तर सूचना करेन, तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे वेगळे दिसत आहेत. अगदी पेहरावाबाबतही. लोकांच्या मनात जी नेत्याबद्दल प्रतिमा असते त्यापेक्षा ते वेगळे आहेत, असंही पंकजा म्हणतात.

राज्यात ‘कोरोना’चे हातपाय पसरण्याआधीच राज्य सरकारने तातडीने पावलं टाकत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याची माहिती जनतेला देत असतात. अशातच, पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील, असा विश्वास ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.

सोशल मीडियापेक्षा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालयावर जास्त अॅक्टिव्ह असतात. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना स्वतः सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह होते. फडणवीसांचा सोशल मीडिया खूप स्ट्राँग होता, ते स्वत: ट्विट करायचे, असं सांगत पंकजा मुंडे यांनी आजी माजी मुख्यमंत्र्यांमधील फरक दाखवला. उद्धव ठाकरे यांचा कल वेगळ्या पद्धतीने दिसतो, त्यामुळे ते नवीन असा पायंडा पाडू शकतात, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे आणि मुंडे कुटुंबाचे नाते

ठाकरे आणि मुंडे कुटुंबामध्ये जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आमच्यातही कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे. राजकारणापलिकडे आमचे नाते आहे’ असं पंकजा मुंडे याआधी ‘टीव्ही9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

पंकजा मुंडे यांना मी बहीण मानतो. एक भाऊ म्हणून मी तिच्याविरोधात कसा लढणार? त्यामुळे पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीत जाहीर केलं होतं. त्यावेळी सेना आणि भाजप स्वबळावर लढले होते.