कोरोना गुणाकार करतोय, आपण वजाबाकी करु : उद्धव ठाकरे

| Updated on: Mar 22, 2020 | 4:22 PM

कोरोना विषाणू गुणाकार करतो. हा गुणाकार टाळायचा असेल तर परदेशातून आलेल्या नागरिकांनी पुढचे काही दिवस आपल्या घरातच राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं (CM Uddhav Thackeray on Corona).

कोरोना गुणाकार करतोय, आपण वजाबाकी करु : उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणू गुणाकार करतो. हा गुणाकार टाळायचा असेल तर परदेशातून आलेल्या नागरिकांनी पुढचे काही दिवस आपल्या घरातच राहावं (CM Uddhav Thackeray on Corona). त्यांनी कुटुंबियांपासूनही वेगळं राहावं. त्यांनी तसं केल्यास आपण कोरोनाची वजाबाकी करु, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या (CM Uddhav Thackeray on Corona).

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता हा जो विषाणू आहे तो कदाचित गुणाकार सुरु करेल. हे फार भयानक आहे. बेरजेचं प्रकरण वेगळं असतं. हा विषाणू गुणाकार करतो. गुणाकार टाळायचा असेल तर जे लोक परदेशातून आले आहेत त्यांनी घरातच वेगळं राहावं. त्यांनी पुढचे काही दिवस घरातून बाहेर पडू नये, समाजात वावरु नये. त्यांनी नातेवाईक आणि कुटुंबियांपासूनही वेगळं राहावं. या लोकांना वेगळं ठेवायची गरज आहे. त्यांच्या संपर्कात येऊ नका. असं केल्यास या विषाणूचा गुणाकार तर आपण टाळूच पण मला खात्री आहे त्याचीच वजाबाकी आपण करु. ही वजाबाकी करणं आपल्याला शक्य आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“आज मध्यरात्रीपासून परदेशातून येणारी सर्व विमान वाहतूक बंद होत आहे. परदेशातून आता कुणीही येणार नाही. आता आपले आपण आहोत. आपला देश आणि आपली माणसं, आपले कुंटुंबीय आणि आपले आपण आहोत. आपल्यालाच या संकटावर मात करायची आहे. परदेशातून आलेल्यांना सरकारने आणि महापालिकेने विलगीकरणाची सुविधा दिलेली आहे. विलगीकरणात असणाऱ्यांची काळजी करु नका. त्यांची संपूर्ण काळजी सरकार आणि महापालिका घेत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात कलम 144 लागू

“कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे आणि म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागामध्ये 144 कलम नाईलाजाने लावत आहे. कृपा करुन पाच पेक्षा जास्त जण फिरु नका. गर्दी करु नका. गृपने फिरु नका. सहज म्हणून कुठे फिरायला जावू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका.”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

संबंधित बातम्या :

संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू, नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांचा निर्णय

जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा