पीएमपीसमोर ‘चिल्लर’ संकट, 20 लाखांचं काय करायचं?

पीएमपीसमोर 'चिल्लर' संकट, 20 लाखांचं काय करायचं?

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : पीएमपीएलच्या तिकीट विक्रीतून जमा झालेल्या तब्बल 20 लाख रुपयांच्या चिल्लरचं करायचं काय, असा प्रश्न पीएमपी प्रशासनाला पडला आहे. गेल्या महिनाभरापासून पीएमपीकडून चिल्लर रक्कम स्वीकारण्यास बँकेने नकार दिला असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. बँक ही रक्कम नाकारु शकत नाही, बँकेने नाकारले तर हा देशद्रोह असल्याचं ज्येष्ठ बँकिंग तज्ञ सांगतात.

रोजच्या तिकीट विक्रीतून पीएमपीकडे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. ही रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लष्कर शाखेत जमा केली जाते. मात्र, बँकेने 4 ऑक्टोबरपासून ही चिल्लर स्वरूपातील रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे.

विशिष्ट मर्यादेपर्यंतच चिल्लर स्वीकारली जाईल, असे बँकेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पीएमपीकडे जमा झालेली तब्बल 20 ते 21 लाख रुपयांची चिल्लर आगारात साठवून ठेवावी लागत आहे. यासंदर्भात पीएमपीने बँकेशी पाठपुरावाही केला. मात्र त्यानंतरही पीएमपी समोरचे चिल्लरबाबतचे संकट कायम आहे. बँकेकडे ठेवायला जागा नाही, असं कारण बँक देते. याबाबत लेखी पाठपुरावा करण्यात आलाय. साठलेल्या चिल्लरमध्ये दहा रुपयांची सर्वाधिक नाणी आहेत. ही चिल्लर सांभाळणे दिवसेंदिवस प्रशासनाला जिकिरीचं होतंय. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने रिझर्व्ह बँकेशीही पत्रव्यवहार केला असून, या संदर्भात आठवडाभरात तोडगा निघेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

पीएमपीच्या मार्गावर दररोज सरासरी 1350 बस धावतात आणि या बसच्या 17 हजारांच्या आसपास फेऱ्या होतात. पीएमपीचे सरासरी दैनंदिन उत्पन्न 1 कोटी 75 लाख रुपये आहे. पीएमपीच्या उत्पन्नतील चिल्लर 20 लाख रुपयांच्या पुढे आहे.

केंद्र सरकारने वैध ठरवलेले आणि रिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात आलेले सर्व प्रकारचे चलन स्वीकारणे बँकांवर बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी परिपत्रक काढून तसे स्पष्टही केले आहे. तरीही वैध चलनातील नाणी न स्वीकारणे हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर अविश्वास दाखविण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे बँकेविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो, असं बँकिंग तज्ञांचं म्हणणं आहे.

प्रवाशांनीही डिजीटल व्यवहारांना प्राधान्य देत एम कार्ड वापरावे, असं आवाहन पीएमपीने केलंय. नाणे हे चलन असून ते नाकारता येत नाही, मात्र बँक हा गुन्हा करत आहेत. या विरोधात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI