काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार या आठवड्यात राजीनामा देतील, चंद्रकांत पाटलांचा दावा

| Updated on: Jul 18, 2019 | 10:15 AM

काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरु असताना राज्याचे महसुल मंत्री आणि  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार या आठवड्यात राजीनामा देतील, चंद्रकांत पाटलांचा दावा
Follow us on

सोलापूर : काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरु असताना राज्याचे महसुल मंत्री आणि  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. या आठवड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देणार असल्याचा दावा पाटील यांनी सोलापुरात केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी कोणते आमदार राजीनामा देणार असा प्रश्न विचारला मात्र चंद्रकांत पाटलांनी त्याचे उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, “जर नावं सांगितली तर त्यातील मजाच संपेल. जीवनाची मजा अनिश्चिततेमध्येच आहे. त्यामुळे ही नावं अशीच गुलदस्त्यात राहु द्या. मात्र या आठवड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठ्या प्रमाणात राजीनामे होतील. येणाऱ्या काळात ती नावंही समजतील.”

6 महिने शिल्लक राहिलेले असताना राजीनाम दिला तर त्याची पोटनिवडणूक होत नाही. 6 महिन्यानंतर पोटनिवडणणुकीला सामोरे जावे लागत नाही. आता तो काळ 3 महिन्यांवर आला. आता जे आमदार राजीनामा देतील त्या जागा रिक्त राहतील. या आठवडाभरात देखील काही काँग्रेस-राष्ट्रावादीचे आमदार आपले राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असंही पाटील यांनी नमूद केलं. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देऊन हातपाय गाळत आहेत, असंही चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांचे राजीनामे काँग्रेसला अधिक अडचणीत आणणारे आहेत. आधीच जागावाटपाचा पेच आणि आता आहे त्या आमदारांच्याही बंडखोरीच्या बातम्या काँग्रेसची चिंता वाढवणाऱ्या आहेत.