सात वर्ष सहन केलं, दु:ख कधीच व्यक्त केलं नाही : धनंजय मुंडे

| Updated on: Jan 20, 2020 | 11:34 AM

"2014 च्या काळात धनंजय मुंडे जसा आला, लोकांनी आणि माध्यमांनी जे मांडलं तसं तुमचं मत झालं. यात मला तुम्हाला दोष द्यायचा नाही. ते माझ्या नशिबात होतं, ते मी भोगलं", असं धनंजय मुंडे म्हणाले.

सात वर्ष सहन केलं, दु:ख कधीच व्यक्त केलं नाही : धनंजय मुंडे
Follow us on

पुणे : “2014 साली मला कुणी चांगलं बोलत नव्हतं. मला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसलं, खलनायक म्हणायचे. माझी लायकी काढली गेली. पण जसजसे लोक माझं काम बघायला लागले धन्याचा धनंजय झाला, धनंजयचा धनू भाऊ झाला आणि आता धनू भाऊचा मंत्री महोदय झाला. शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीने सोबत असते. हे मी पाहिलं आणि अनुभवलं. गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं, या गोष्टीचं दुःख कधीच व्यक्त केलं नाही”, असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

पुण्यात स्थायिक झालेल्या परळीच्या नागरिकांनी पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (20 जानेवारी) आभार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) भावूक झाले.

“2014 च्या काळात धनंजय मुंडे जसा आला, लोकांनी आणि माध्यमांनी जे मांडलं तसं तुमचं मत झालं. यात मला तुम्हाला दोष द्यायचा नाही. ते माझ्या नशिबात होतं, ते मी भोगलं. शेवटी स्वकर्तृत्वाने मिळालेलं कायम राहतं, अलगद मिळालेलं टिकत नाही”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

“काही अनुभव असे आहेत की, सोशल मीडियावर दीडशे शिव्या देणारी व्यक्ती आज कुणालातरी पुढे करुन कामं घेऊन येते. मला लक्षात आहे की या माणसाने आपल्याला दीडशे शिव्या दिल्या आहेत. पण मी राग ठेवत नाही. मी त्याचंही काम करतो. शेवटी यालाच मनाचा मोठेपणा म्हणतात”, असंदेखील धनंजय मुंडे म्हणाले.

या कार्यक्रमात बोलत असताना धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. “पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी पाच वर्षांपूर्वी मला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली नसती तर आज हा धनू भाऊ तुम्हाला कुठेच दिसला नसता”, असं धनंजय मुंडे म्हणाले.