कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा

| Updated on: Oct 19, 2020 | 3:30 PM

कांद्याला चांगला भाव मिळत असून केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतल्यास केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये फिरकू देणार नाही, असा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. farmers warns state and central govt to not import onion

कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा
Follow us on

लासलगाव : कांद्याच्या बाजारभावात दररोज वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना फिरकू न देण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. ( farmers warns state and central govt to not import onion)

कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याने कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी केली तर नाही ना या तपासणीसाठी लासलगाव येथील 10 तर पिंपळगाव बसवंत व नाशिक येथील प्रत्येकी एक अशा 12 कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे मारून तपासणी केली होती. या तपासणीनंतर लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत 2 हजार 91 रुपयांची प्रति क्विंटल मागे आज सोमवारी वाढ होत 6 हजार 891 रुपये इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे.

औरंगाबाद येथील प्राप्तिकर विभागाची छापेमारी झाल्याने लासलगाव येथील व्यापारी वर्गाने कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तीन ते चार दिवस लासलगाव येथील कांदा लिलाव ठप्प झाले होते. त्यानंतर आज कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले आहेत. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 410 वाहनातून विक्रीसाठी 4 हजार 700 क्विंटल कांदा दाखल झाला होता. या कांद्याला सुमारे 6 हजार 891 रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. सरासरी 6 हजार 200 रुपये आणि कमीतकमी 1 हजार 500 रुपये इतका भाव प्रतिक्विंटल मिळाला. गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या कांदा लिलावात 4 हजार 800 रुपये भाव कांद्याला मिळाला होता.

आज जो कांद्याला भाव मिळत आहे त्या भाव वाढीचे शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत आहे. मात्र, मागील अनेक महिने अत्यंत कवडीमोल भावाने आम्ही आमचा कांदा विकलेला आहे. त्यामुळे आमचे झालेले नुकसान कसेबसे या भावाने भरून निघणार आहे, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने लाल कांदा तसेच उन्हाळ कांद्याचे रोप आमचे पाण्यात गेले आहे. सुमारे दीड लाख रुपये खर्च करून ही लाल कांद्याचे भवितव्य पूर्णपणे अंधारमय झाले असल्याची भावना शेतकऱ्यांननी व्यक्त केली.

वाढते कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आधी निर्यातबंदी त्यानंतर कांद्याच्या व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी करण्यात आली. आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघालेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा आयात करू नये. अन्यथा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना फिरकून न देण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने भारत दिघोळे यांनी दिला.

संबंधित बातम्या: 

Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीचा प्रश्न पेटला, लासलगावमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

Sadabhau Khot | लासलगावमध्ये कांदाप्रश्नी केंद्रसरकार विरोधात सदाभाऊ खोत यांचे आंदोलन

(farmers warns state and central govt to not import onion)