जळगावात फुलांचे दर वाढणार, पावसाच्या सावटामुळे उत्पादक चिंतेत

| Updated on: Oct 16, 2020 | 6:51 PM

नवरात्रोत्सवात फुलांचे दर वधारणार आहेत. काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असताना फुलांच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झालाय. Flower rates jalgaon

जळगावात फुलांचे दर वाढणार, पावसाच्या सावटामुळे उत्पादक चिंतेत
Follow us on

जळगाव – जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. ऐन नवरात्रोत्सवात फुलांचे दर वधारणार आहेत. काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असताना फुलांच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झालाय. फुलांच्या भावात दरवाढ झाली असली तरी उत्पादक मुसळधार पावसामुळे चिंतेत आहेत. (Flower rates increased in market of Jalgaon)

नवरात्रोत्सवात फुलांना अधिक मागणी असते. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस व विजयादशमीला असे दहा दिवस झेंडूला मागणी असते. झेंडूचे उत्पादक शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये झेंडूचे उत्पादन येईल, या पद्धतीने शेती केली आहे. सध्या झेंडूला असलेली मागणी पाहता शंभर रुपये प्रतिकिलो दर नवरात्रोत्सवात मिळेल, अशी अपेक्षा फूल उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

झेंडूच्या फुलांच्या माळा करून नवरात्रोत्सवात देवीला चढवल्या जातात. यामुळे झेंडूला या दिवसांत अधिक मागणी असते. नवरात्रोत्सव, दिवाळीचे दिवस फुलांच्या मागणीचे असतात. शिरसोली (ता. जळगाव) येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांना मागणी असते. काही व्यापारी येथून फुले घेऊन परजिल्ह्यात फुले विकतात.

जळगाव शहरात शिरसोली येथील फूल उत्पादक दररोज आठ ते दहा टन फुलांचा पुरवठा करतात. उत्सवाच्या काळात फुलांना अधिक मागणी असल्याने पुरवठाही दुप्पट होतो. मात्र, कोरोनामुळे यंदा फूल उत्पादकांनी फूल शेतीकडे कमी लक्ष दिले आहे. फुले तोडण्यासाठी लागणारे मजूर कोरोना संसर्गामुळे येतील किंवा नाही याची शंका त्यांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीचे प्रमाण कमी केले आहे.

झेंडू आणि इतर फुले नवरात्रोत्सव व दिवाळीत बाजारात जातील या दृष्टीने फूल शेती उत्पादकांचे नियोजन असले तरी येणारे संभाव्य वादळ, पावसावर ते अवलंबून आहे. अतिवृष्टी, वादळाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असल्याने फूल उत्पादक चिंतेत आहेत. चार-पाच दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. यात अतिवृष्टी झाल्याने फुलांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे बाजारपेठेत फुलांची आवक कमी होईल. परिणामी फुलांचा दर वधारेल, असे चित्र आहे.

जळगावात फुलांचे दर असे

फुले          आजचा भाव
झेंडू                60 रु प्रति किलो
गुलाब             200 रु
मोगरा              100 रु
पिवळा झेंडू         70 रु

संबंधित बातम्या : 

Satara | सातारा | कास पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण

Mumbai Ganeshostav 2020 | मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी

(Flower rates increased in market of Jalgaon)