इंदोरीकर महाराजांचा शिवजयंतीनिमित्त खास सल्ला, मोशीत जंगी मिरवणूक

| Updated on: Feb 17, 2020 | 3:10 PM

मोशी ग्रामस्थांनी इंदोरीकर महाराजांची (Indurikar Maharaj Moshi Kirtan) गावाच्या वेशीपासून बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

इंदोरीकर महाराजांचा शिवजयंतीनिमित्त खास सल्ला, मोशीत जंगी मिरवणूक
Follow us on

पुणे : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj Moshi Kirtan) किर्तनाचा कार्यक्रम आज पुण्यात झाला. शिवजयंती महोत्सवानिमित्त मोशी गावात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन आलं होतं. यावेळी मोशी ग्रामस्थांनी इंदोरीकर महाराजांची (Indurikar Maharaj Moshi Kirtan) गावाच्या वेशीपासून बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

यावेळी इंदोरीकर महाराजांनी शिवजयंतीनिमित्त खास सल्ला दिला. “शिवजयंतीला संकल्प करा की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याची राख नदीत टाकू नका. ती राख शेतीतील मातीत टाका. किंवा त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून, त्या झाडाला ती राख टाका, झाडे वाढतील आणि नद्या निर्मळ राहतील”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

“राख शेतात टाका. शेतात नसेल तर घरी घेऊन ती झाडाच्या कुंडीत टाका. गावातला माणूस गावात सुखाने जगेल हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. नदी स्वच्छ होईल. शिवार झाडांनी भरुन जाईल, शिवरायांचं स्वप्न साकार होईल”, असं इंदोरीकर महाराजांनी सांगितलं.

“ज्ञानोबाराय पण झाडं लावण्याचा सल्ला देत होते. झाडाला एक वर्ष पाणी घातलं तर झाड माणसाला आयुष्यभर सेवा देईल. शाळेत जाणाऱ्यांनी शाळेत एक झाड लावावं, सासरी आलेल्या मुलीने बापाच्या आठवणीत एक झाड लावावं, माहेरी आलेल्या लेकीने आपली आठवण म्हणून झाड लावावं,  ग्राम पंचायत सदस्यांनी निवडून आलो म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये 2 झाडं लावावी”, असा सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला.

जी माणसं मोठ्याने हसतात, ती निर्मळ असतात. गालात हसतात ती गद्दार असतात. मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरुन निर्मळ. हसत यावं, हसत जावं, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

मी महाराज होऊन 26 वर्ष झाली, पण 26  वर्षात झालं नाही ते आठवड्यात झालं. 26 वर्ष बोलतोय तेच बोललो, पण तेव्हा काही झालं नाही. आत्ता झालं. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी आधीच सांगतो माझं बोलणं तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, तरुणींनो बाहेर फिरता आलं पाहिजे, सौरक्षणाचे धडे घ्या आणि तरुणांनो मित्र तपासून घ्या, सोबत भावकी आणि नातेवाईकांपासून सावध रहा, असाही सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला.

संबंधित बातम्या

वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन