कोरेगाव भीमा: अफवा नको, निर्धास्तपणे या: विश्वास नांगरे पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे: कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारीला होणाऱ्या विजय दिनाच्या सोहळ्यानिमित्त पोलिसांनी काटेकोर नियोजन केलं आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त संदीप पाटील उपस्थित होते. गेल्या वर्षी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी, […]

कोरेगाव भीमा: अफवा नको, निर्धास्तपणे या: विश्वास नांगरे पाटील
Follow us on

पुणे: कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारीला होणाऱ्या विजय दिनाच्या सोहळ्यानिमित्त पोलिसांनी काटेकोर नियोजन केलं आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त संदीप पाटील उपस्थित होते. गेल्या वर्षी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात झालेल्या हिंसाचाराचं लोण राज्यभर पसरलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली आहे.

विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांनी सुरक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. पार्किंग, ट्रॅफिक व्यवस्थेचं नियोजन केलं आहे. गर्दीचं नियमन करण्यास प्राधान्य राहील . खाणे-पिणे, पार्किंग, टॉयलेट याबाबतच जिथल्या तिथे व्यवस्था लावली आहे. मी गेली 6 दिवस या परिसरात आहे. नियोजन पूर्ण झालं आहे. गर्दीचं नियोजन करण्यात आलं आहे. मुलं आणि वयोवृद्ध यांच्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. येणाऱ्या रॅलीची काळजी घेतली आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी विशेष नियोजन असेल, जड वाहतूक वळवण्यात आली आहे. याशिवाय 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग आणि टॉयलेटची  सुविधा करण्यात आली आहे”

गर्दीचं नियमन सर्वात महत्वाचा भाग आहे. वृद्ध , महिला, बालकं यांच्यासाठी विशेष नियोजन केलं आहे. मानव आणि नैसर्गिक आपत्तीच्या  वेळेस काय  करावं याचा आढावा घेण्यात आला आहे. वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

या व्यतिरिक्त जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात सुरक्षा फोर्स मागवण्यात आला आहे. 5 हजार पोलीस, एसआरपीएफ बंदोबस्त, 2 हजार स्वयंसेवक , 12 हजार होमगार्ड असा ताफा सुरक्षेसाठी सज्ज असेल. 31 डीवायएसपी, 8 अतिरिक्त पोलीस अधिक्षक तैनात असतील, असं नांगरे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, भीमा कोरेगावमध्ये 1 तारखेला काही परिसरात वीज बंद राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

खोटे मेसेज पसरवू नका

यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी खोटे मेसेज पसरवू नका असं आवाहन केलं. चुकीचे आणि अफवा पसरवणारे मेसेज पाठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यासाठी सोशल मीडियावर आमचं लक्ष असेल, असंही त्यांनी सांगितलं.

अचानक कोणतीही अफवा पसरु नये, त्यासाठी सोशल मीडियावर नजर राहणार आहे.  भाविकांनी निर्धास्तपणे दर्शनाला यावे. मनात कोणतेही किंतू परंतु  न ठेवता यावे, असं आवाहन नांगरे पाटील यांनी केलं.


संबंधित बातम्या 

भीमा कोरेगाव : 5 हजार पोलीस, 12 हजार होमगार्ड, 12 SRPF तुकड्या तैनात