भीमा कोरेगाव : 5 हजार पोलीस, 12 हजार होमगार्ड, 12 SRPF तुकड्या तैनात

  • Sachin Patil
  • Published On - 12:21 PM, 29 Dec 2018
भीमा कोरेगाव : 5 हजार पोलीस, 12 हजार होमगार्ड, 12 SRPF तुकड्या तैनात
प्रातिनिधिक फोटो

अहमदनगर: भीमा कोरेगाव इथे 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी साडेपाच हजार पोलीस, भीमा कोरेगाव इथं दाखल झाले आहेत. 1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी भीमा कोरेगाव इथं येतात. मात्र गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारानंतर राज्यभर उसळलेली दंगल पाहता, यंदा पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन केलं आहे.

पोलिसांनी तयारी कशी?

1 जानेवारी 2019 रोजी रणविजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम, कोरेगाव भीमा इथं 7 ते 8 लाख अनुयायी येतील असं गृहित धरुन पोलिसांनी तयारी केली आहे.

उपाययोजना :

पुणे – नगर रस्ता इतर वाहतुकीसाठी बंद असेल.

अग्निशामक दलाच्या 23 गाड्या तैनात असतील

22 रुग्णावाहिका उपलब्ध असतील

151 बसेस

11 ठिकाणी पार्किंग व्यवस्था

35 ठिकाणी स्पीकर्स सिस्टिम्स

11 ड्रोन कॅमेरे

पार्किंगच्या ठिकाणी खान्याचे स्टॉल्स

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

250 मोबाईल स्वच्छता गृह

100 सीसीटीव्ही कॅमेरे

10 पट अधिक बंदोबस्त

5000 पोलीस, 12,000 होमगार्ड, 12 एसआरपीएफ, 400 स्वयंसेवक अशी तकडी टीम या कार्यक्रमाचं नियोजन करेल.

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद नजरकैदेत

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद हे कालपासून मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत आहे. तर मुंबईत ठिकठिकाणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. चंद्रशेखर यांना कोणत्याच सभेला न जाऊ देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठा पोलीस बंदोबस ठेवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी साडेपाच हजार पोलीस दाखल झाले आहेत. 1 जानेवारीला 7 ते 8 लाख अनुयायी कोरेगाव भीमामध्ये जमण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सभा घेण्यावर ठाम

दरम्यान, पुण्यात भीम आर्मीची सभा घेण्यावर आयोजक ठाम आहेत. मात्र पोलिसांनी अद्यापही सभेसाठी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी जर परवानगी नाकरली तरी सभा घेण्यावर आयोजक ठाम आहेत.

वाचा – भीमा कोरेगावला भीम आर्मी आणि ब्राह्मण महासंघ आमनेसामने? 

कोण आहेत चंद्रशेखर आझाद?
– चंद्रशेखर आझाद हे नाव उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचारानंतर सर्वांसमोर आलं.
– या दंगलीनंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली.
– देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे
– सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून काही दिवसांपूर्वीच सुटका झाली.
– देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख बनली.

भीम आर्मी
चंद्रशेखर आझाद यांनी तीन वर्षापूर्वी भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली आहे. बहुजन समाजासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना केल्याचं आझाद यांचं म्हणणं आहे.दलित, बहुजन समाजाच्या सुरक्षेसाठी आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना काम करत असल्याचं आझाद यांनी सांगितलं.

चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्र दौरा

29 डिसेंबर : मुंबईतील दादर चैत्यभूमी इथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार, संध्याकाळी 4 वाजता वरळीतील जांबोरी मैदान येथील महाराष्ट्र भीम आर्मी आयोजित पहिल्या आंबेडकरी जनचेतना सभेला मार्गदर्शन
30 डिसेंबर : पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन
31 डिसेंबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद आंबेडकरी तरुणाईशी या कार्यक्रमाचे आयोजन
1 जानेवारी 2019 – भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करुन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विजय स्तंभावर पुष्पवृष्टीचं नियोजन
2 जानेवारी 2019 – लातूरमध्ये जाहीर सभा
4 जानेवारी 2019 – अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जाहीर सभा

संबंधित बातम्या 

 भीमा कोरेगावला भीम आर्मी आणि ब्राह्मण महासंघ आमनेसामने?   

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही नजरकैदेत  

‘भीम आर्मी’चे चंद्रशेखर आझाद मुंबईत नजरकैदेत