दारु पिताना किरकोळ वाद, तरुणाची हॉटेलमध्येच गळा चिरुन हत्या

भुसावळमध्ये दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन हत्या करण्यात आली

दारु पिताना किरकोळ वाद, तरुणाची हॉटेलमध्येच गळा चिरुन हत्या
| Edited By: | Updated on: Aug 31, 2019 | 4:40 PM

जळगाव : जळगावात दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हॉटेलमध्येच हत्या (Jalgaon Bhusawal Murder) करण्यात आली. भुसावळमधील खानदेश हॉटेलात आरोपीने गळा चिरल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

भुसावळमधील पांडुरंग टॉकीजजवळ असलेल्या खानदेश हॉटेलच्या परमीट रुम अ‍ॅण्ड बिअर बारमध्ये हा प्रकार घडला. 32 वर्षीय विकास वासुदेव साबळे याला या घटनेत जीव गमवावा लागला. विकास हा नेपानगरमध्ये रेल्वेत गँगमन असल्याची माहिती आहे. 26 वर्षीय आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे याला पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या.

विकास आणि निलेश शुक्रवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास दारु पित होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन शाब्दिक वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या निलेशने कटरने विकासच्या गळ्यावर वार केला.

रक्तबंबाळ अवस्थेत विकासला जळगावला हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.