लातूरच्या शेतकरी पित्याचं पत्र, लेकीच्या लग्नाला सिने कलाकारांची फौज

लातूर जिल्ह्यातल्या किनगावात राहणाऱ्या दत्ता जवळगे या शेतकऱ्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला कलाकारांची फौज आली होती

लातूरच्या शेतकरी पित्याचं पत्र, लेकीच्या लग्नाला सिने कलाकारांची फौज
| Updated on: Jan 31, 2020 | 1:28 PM

लातूर : आपल्या लग्नाला मालिका-चित्रपटात झळकणाऱ्या बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावावी, असं कोणाला नाही वाटत?लातूरमधील सिनेरसिक शेतकऱ्याचीही अशीच इच्छा होती. आश्चर्य म्हणजे, लेकीच्या लग्नासाठी बापाची ही हौस सिने कलाकारांनी पूर्ण (Latur Farmer Daughter Wedding Actors) केली.

लातूर जिल्ह्यातल्या किनगावात राहणाऱ्या दत्ता जवळगे या शेतकऱ्याच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. या लग्नाला मराठी सिने विश्वातील प्रख्यात अभिनेते आणि अभिनेत्री आवर्जून उपस्थित राहिले होते. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम, दिग्गज सिने अभिनेत्री प्रेमा किरण, टीव्ही-नाट्य अभिनेत्री माधवी जुवेकर, अभिनेता सचिन गवळी यांच्यासह अनेक कलाकार विवाहाला हजर होते.

वधूचे वडील दत्ता जवळगे हे शेतकरी आहेत. शेतकरी असूनही त्यांनी नाट्य आणि सिनेमाची आवड जपलेली आहे. अभिनेत्यांना भेटणं, त्यांच्या अभिनयाचं कौतुक करणं, त्यांना पत्र लिहिणं या माध्यमातून त्यांचा संपर्क सुरु असतो.

जवळगेंच्या आस्थेवाईकपणामुळे मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींशी त्यांचं आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे. आपल्या लाडक्या प्रेक्षकाशी असलेलं हेच नातं जपण्यासाठी किनगाव सारख्या ग्रामीण भागात हे कलाकार 600 किलोमीटर अंतर पार करुन मुंबईहून आले होते.

ज्या कलाकारांना केवळ मोठ्या पडद्यावर पाहिलं आहे, त्यांना शेजारी उभं राहून अक्षता टाकताना पाहून लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हरखून गेला होता. अभिनेते आणि मराठी रसिक यांचं नातं दाखवून देणारा हा विवाह सोहळा वऱ्हाडी मंडळींना आश्चर्यचकित करणारा (Latur Farmer Daughter Wedding Actors) ठरला.