सोलापूरमध्ये 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

| Updated on: May 13, 2020 | 2:51 PM

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलीस कर्मचाऱ्यांना (Maharashtra Police Corona Cases) घरी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोलापूरमध्ये 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
Follow us on

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलीस कर्मचाऱ्यांना (Maharashtra Police Corona Cases) घरी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व पोलीस कर्मचारी 55 वर्षांवरील असून त्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोलापूरमध्ये 152 पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत (Maharashtra Police Corona Cases).

कोरोनाविरोधाच्या लढ्यात पोलीस प्रशासन 24 तास काम करत आहे. राज्यात लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावत असताना काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे यात वयस्कर कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून 55 वर्षांवरील पोलिसांना घरी थांबण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण 925 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 100 अधिकारी आणि 825 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 84 अधिकारी आणि 709 अशा एकूण 793 पोलिसांना कोरोना लक्षणे दिसून येत आहेत. तर 16 अधिकारी आणि 108 पोलीस कर्मचारी असे एकूण 124 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 8 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राची 20 सुरक्षा पथकं पाठवा, राज्याची केंद्राकडे मागणी

दरम्यान, राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा पथकांची मागणी केली आहे. केंद्राने 20 पथकं महाराष्ट्रात पाठवावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. “राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान आणि येणारा ईद सण तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली”, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.