आधी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला, आता मनोज जरांगेंचं CM फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज; म्हणाले…
500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बनंतर मनोज जरांगेंचं CM फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. त्यांनी दोघे ऑडिओ क्लिपमधील सत्य बाहेर आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ बॉम्बवरून नवनवीन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या ऑडिओ क्लिपवरून रामदास कदम यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दोन्ही पक्षातील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता वरिष्ठ नेत्यांनी संयमाने भूमिका घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप काहीसे थांबवल्याचे दिसत आहे. याचदरम्यान याच ऑडिओ बॉम्बवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलंय. दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी ऑडिओ क्लिपमागील सत्य शोधून दाखवावे, असं चॅलेंजच मनोज जरांगे पाटील यांनी दोघांना दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘आमचं आंदोलन चिरडायला लागलात. आता दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करू लागले. एकमेकांवरील आरोप थांबवा, म्हणजे तिसऱ्याचा लाभ होईल. म्हणजे ही क्लिप खरी ठरेल. खरी ठरल्यावर लाभ माझा आणि समजाचा होईल. दोन मांजरीच्या भांडणात…तिसऱ्याचा लाभ होईल, असं तुम्ही म्हणताय… याचा काय अर्थ आहे. तुमच्या भांडणात खरं होईल. त्यामुळे भांडण मिटवत आहेत. क्लिप खरी ठरू नये, यासाठी तुम्ही एक होणार. आमच्या माणसाकडून समाज संकटात आणला. लोकांनी शिंदे साहेबांसाठी काम केलं. त्यांनी तरी विचारलं पाहिजे होतं, हे आंदोलन मोडायचं काय काम आहे. मी उघडं पाडणार, छडा लावणार असे त्यांनी म्हणायला पाहिजे होते’.
‘फडणवीसांसाठी देखील मराठ्यांनी काम केलं नाही का…त्यांच्यासाठी जात मोडली. त्यांना मतदान देखील केले. तुम्ही मराठ्यांना साथ देणार नाही, तर जो बंद पाडणाऱ्यांना साथ देणार का… मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्यांना वाचवणार का… तुम्ही त्यांना वाचवणार. मराठ्यांचं आंदोलन वाचवायचं नाही. ते चिरडू द्यायचं. मग संशय येणार नाही का… काही करून हे खोटं ठरवावं लागणार आहे. ही कुजबूज सुरू आहे. पडद्यामागे पुन्हा प्लानिंग सुरू झाली आहे. समाजात डॅमेज होणार, विश्वासार्हता गमावणार आहेत. विरोधी पक्ष चावून खाईल. त्यामुळे ही चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे. परंतु मी पुरावे आल्यावर बोलेन, असे जरांगे म्हणाले.
‘ही कुजबुज खरी असण्याची दाट शक्यता आहे. त्यांना अशी चलबिचल झाली की आपल्यावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे आता यांची धावाधाव सुरू आहे. हे सत्य आहे. खोटं नाहीये, त्यामुळे शिंदे आणि फडणवीस हे शोधूनच काढतील ही अपेक्षा ठेवून आहे. फडणवीस आणि एसआयटी नेमली, त्याच्या माध्यमातून फॉरेन्सिककडे व्यवस्थित लक्ष ठेवतील. एकनाथ शिंदे सुद्धा लक्ष ठेवतील. कारण त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन हे खरंच हे उघड पाडणे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्हाला खूप आशा आणि अपेक्षा आहे की, हे सत्य बाहेर मुळातून बाहेर फडणवीस काढतील. त्यांनी सुद्धा सत्ता सोबत राहावं आणि ते सुद्धा विश्वासार्हता कमावतील. खरं ठरवायचं की खोटं ठरवायचं हे यांच्या हातात आहे. परंतु मी सत्य हे जगापुढे आणि समाजापुढे आणत राहणार आहे, असे जरांगे पाटील पुढे म्हणाले.