कपटी औरंगजेब की आग्यावेताळ अफझलखान; शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण?

मुघल बादशहा औरंगजेब आणि विजापूर सरदार अफझलखान हे दोघेही तसे तुल्यबळ शत्रू... अफझलखान याने एका लढाईत औरंगजेब याला पराभूत केल होते. तर, शिवाजी महाराज यांनी त्याच अफझलखानाचा वध केला. अफझलखान आणि औरंगजेब या दोघांचाही पूर्वेतिहास पाहिला असता शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण याचे उत्तर नक्कीच मिळते.

कपटी औरंगजेब की आग्यावेताळ अफझलखान; शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण?
SHIVAJI MAHARAJ, AURANGZEB AND AFZALKHANImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 7:04 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लढाया लढल्या. शिवाजी महाराज यांनी विजापूरचा आदिलशहा, मुघल बादशहा, पोर्तुगीज शिवाय फितूर मराठा सरदार यांच्याविरोधात अनेक मोहिमा उघडल्या. अनेक बलाढ्य शत्रूंना पराभूत केले. विजापूर सरदार अफझलखान याच्याविरोधातील 1659 मधील प्रतापगडाची लढाई ही शिवाजी महाराज यांचे शौर्य, त्यांचे नेतृत्वगुण दाखविणारी होती. तर, मराठा साम्राज्य बुडविण्याच्या हेतूने महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेब याला अखेरपर्यंत झुंजवत ठेवण्याचा पराक्रमही शिवाजी महाराज यांनी केला. मुघल बादशहा औरंगजेब आणि अफझलखान हे दोघेही तसे तुल्यबळ शत्रू होते. अफझलखान आणि औरंगजेब या दोघांचाही पूर्वेतिहास पाहिला असता शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण याचे उत्तर नक्कीच मिळते. काय आहे तो इतिहास? अफझलखान याचे खरे नाव काय, कुळ काय? तर, औरंगजेब याच्याशिवाय शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. यासाठीच हा शत्रू किती बलाढ्य होता हे जाणून घ्यायलाच हवे.

अफझलखान आणि शहाजी राजे यांचे वैर

सन 1637 चा काळ. विजापूरचा बादशहा अली आदिलशहा (दुसरा) याच्या दरबारात शहाजीराजे भोसले यांचा दबदबा वाढत होता. कर्नाटकमधील राजा रायारायल हा विजापूरकरांच्या तिकडील प्रांताला उपद्रव देत होता. आदिलशहा याने रणदुल्लाखान याला सरलष्कर किताब देऊन त्याच्यासोबत शहाजीराजे यांना राजा रायारायल याच्या बंदोबस्तासाठी पाठवले. शहाजीराजे यांनी दोन वेळा मोठी लढाई करून त्याचा पराभव केला. अक्कलकोट. बागलकोट, कोल्हार, बेंगळूर, वासकोट, बाळापुर, शिरटे हे परगणे त्यांनी काबीज केले. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत आदिलशहा याने शहाजीराजे यांनी जिंकलेले परगणे त्यांना जहागीर म्हणून दिले. शहाजीराजे यांचा हा वाढता दबदबा आदिलशहाचा आणखी एका बलाढ्य सरदाराच्या डोळ्यात खुपत होता. धिप्पाड देह, वागण्या बोलण्यात गुर्मी, बेफिकीरपणा, अंगाअंगात भरलेली लबाडी असा तो सरदार एकप्रकारे आग्यावेताळ सारखाच भासत असे. हा सरदार होता खान अली शानखाम अजम अफझलखान…

कोण होता अफझलखान?

विजापूर सरदार रणदौलाखान याच्या हाताखाली अफझलखान याने कर्नाटक मोहिमेत सहभाग घेतला होता. त्याच्या कारकिर्दीची ती सुरवात होती. अफझलखानाने कर्नाटकातील अनेक राजांचा बंदोबस्त केला होता. शिरे, बसवपट्टण, बेलूर, टुमकूर चिकनायकनहळ्ळी, जिंजी ही राज्ये जिंकली. मुदराई शहर पुर्ण उध्दवस्त तर कांची साफ लुटले होते. केंगनायकावर विजय मिळवून त्याने बसवपट्टण किल्ला ताब्यात घेतला होता. केवळ अफझलखानाच्या भितीनेच 1643 मध्ये सिद्दी अंबरने रणदुल्लाखानासमोर समर्पण केले होते. तर, शिरेपट्टणचा राजा कस्तुरीरंगाला गाफील ठेवून कपटाने मारले होते. अफझलखान याने आपल्या सशक्त कौशल्य आणि हुकमती क्षमतेने अली आदिलशाह (दुसरा) याच्या दरबारात उच्चपद प्राप्त केले होते. अली आदिलशाह याने त्याला हिऱ्यांनी भरलेली आणि अदिली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध तलवारीने सन्मानित केले होते. तसेच, ‘ढाल-गज’ नामक अत्यंत लोकप्रिय अशी हत्तीची अंबारीही दिली होती.

पारिवारिक पार्श्वभूमी

अफझलखान याच्या पूर्वजांविषयी इतिहासात काही माहिती उपलब्ध नाही. परंतु, अदब-इ-आलमगीरी मध्ये औरंगजेब याने शहाजहानला पाठवलेल्या पत्रामध्ये ‘अफझलखान नावाचा भटारी रणदुल्लाखानाचा सरनोबत आहे आणि सध्या आदिलखानाने त्याला पुत्र म्हणून मोठी दौलत दिली आहे” असा उल्लेख आहे. अज्ञानदास यांच्या पोवाड्यामध्येही शिवाजी महाराज अफझलखानाला उद्देशून म्हणतात “खाना जातीके कोण? आम्ही जाणतो तुम्हाला, तू रे भटारणिका छोरा” असे म्हटले आहे. यावरून तो सामान्य कुळात जन्मला असावा असे ऐतिहासिक दाखल्यावरून दिसून येते.

औरंगजेबाचा पराभव

अफझलखान याच्या पराक्रमाची प्रचिती मुघल बादशहा औरंगजेब यालासुद्धा आली होती. 2 ऑगस्ट 1657 ला औरंगजेब याने विजापूरकरांचा बिदरचा आणि कल्याणी किल्ला जिंकला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आजूबाजूच्या प्रदेशात वळवला. विजापूर दरबाराने औरंगजेबावर आक्रमण करण्यासाठी खान महम्मद आणि अफझलखानाला पाठविले. अफझलने पराक्रमाची शर्थ केली आणि औरंगजेबाला कात्रीत पकडले. अफझलकडून पकडला तरी जाणार किंवा मारला जाणार अशी औरंगजेब याची स्थिती झाली होती. औरंगजेब याने खान महम्मद याला विनवणी केली आणि तो पळून गेला. त्यामुळे अफझलखानाच्या हातातून औरंगजेब निसटला. महम्मद याने औरंगजेबाला सोडले हे अफझलखानाने आदिलशाह आणि त्याची आई ‘बडी साहिबा’ यांचे कान भरून सांगितले. त्यामुळे खान महम्मद विजापूरला आला तशी त्याची खांडोळी उडाली.

शहाजी राजे यांच्या पायात बेड्या घातल्या

वास्तविक शहाजीराजे आणि अफझलखान यांनी विजापूरच्या आदिलशहासाठी 1638 ते 1644 या काळात एकत्र काम केले होते. परंतु, शिवाजी महाराज यांचे मावळ प्रांतातील आदिलशाहच्या ताब्यातील किल्ले घेण्याचा सपाटा सुरु केला त्याच्या या धोरणाला शहाजीराजे यांची फूस असल्याच्या संशय आदिलशहा याला आला. त्यामुळे त्याने शहाजीराजे यांना अटक करण्यासाठी अफझलखान, मुस्तफाखान, बाजी घोरपडे यांना पाठविले. पार येथील छावणीमध्ये शहाजींराजे यांना अटक करण्यात आली. त्यावेळी अफझलखानाने शहाजीराजे यांच्या पायात बेड्या घालून विजापूरला नेले होते.

अफझलखानाचा वैशिष्ठपूर्ण शिक्का

अफझलखान हा जरी आदिलशहाचा सरदार असला तरी 1638 नंतर तो स्वतंत्र सरदार झाला असे त्याच्या काही पत्रांवरून दिसते. अफजलपूर या गावात त्याने शिलालेख कोरला. त्यात तो स्वतःचे ‘कातीले मुतमर्रीदान काफिरान, शिकंदे बुनियादे बुतान’ म्हणजेच काफिरांची कत्तल करणारा आणि पायापासून मूर्ती उखडून टाकणारा असे करतो. आणखीन एका शिलालेखामध्ये तो स्वतःचे वर्णन ‘दीन दार कुक्रशिकन! दीन दार बुतशितन!’ असे करतो. मी काफिरांचा संहार करणारा! माझ्या धर्माचा सच्चा सेवक! आणि अन्य धर्माच्या मूर्तीचा भंग करणारा असा अफझलखान आहे हा त्याचा अर्थ आहे.

अफझलखान याने स्वताचा शिक्का बनविला होता.

गर्र अर्ज कुदन सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफझल अझ हर मुल्की बजाए तसबीह. आवाज आयद अफझल अफझल

याचा अर्थ असा आहे की, जर उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारणा केली की सामान्य माणूस आणि अफझलखान यांच्यात श्रेष्ठ कोण आहे? तर जपमाळेतूनही आवाज येईल अफझल! अफझल!

शिवाजी महाराज यांनी वध केला

नोव्हेंबर 1656 मध्ये अली आदिलशहा याने शिवाजीचे कोकणातील वाढते वर्चस्व रोखण्यासाठी अफझलखानास पाठविण्याचे ठरवले. अफझलखाननेही शिवाजीला मारण्याचा विडा विजापूर दरबारात उचलला. 12 हजार अश्वदळ, 10 हजार पायदळ, 75 मोठ्या तोफा, 400 लहान पहाडी तोफा असे मोठे सैन्य घेऊन तो वाईला पोहोचला. तर, खानाची कोंडी करण्यासाठी शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर मुक्काम हलवला. अफझलखानाच्या सैन्याने स्वराज्यात धुमाकूळ घातला. प्रदेशात नुकसान करूनही शिवाजी महाराज प्रतापगड सोडत नाही हे पाहून अफझलखान याने महाराजांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. वकील कृष्णाजी भास्कर यांना भेट घेण्यासाठी पाठविले. महाराजांनी आपले वकील पंताजी गोपीनाथ यांना कृष्णाजी भास्कर यांच्यासोबत खानाच्या भेटीस पाठवून अंतर्गत माहिती काढण्यास सांगितले. दोन्ही वकीलांच्या भेटीअंती अफझलखान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीची तारीख आणि तपशील ठरला.

10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड माची येथे अफझल आणि शिवाजी महाराज भेट ठरली. भेटीदरम्यान अफझलखान याने शिवाजी महाराज यांच्या अंगावर वर केला. पण, त्यांनी अंगात चिलखत घातल्यामुळे तो वार वरच्यावर झेलला गेला. शिवाजी महाराज यांनी त्याचक्षणी लपवलेली वाघनखे काढून अफझलखानाच्या पोटाचा कोथळा बाहेर काढला. अफझलवधानंतर संधीची वाट पाहत असलेली मावळ्यांनी खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली.

कपटी अफझलखान

कर्नाटकात शिरेपट्टणचा राजा कस्तुरीरंग याच्यावर अफझलखानाने हल्ला केला. कस्तुरीरंगाने त्याला चांगलाच इंगा दाखवला. तो राजा हातात येईना म्हणून अफझलखानाने तहाची बोलणी करायला बोलवून फसवून मारले. अगदी महाराजांनाही अफझलखानाने असेच बोलावले होते. त्यामुळे महाराज त्याला पूर्णपणे ओळखून होते. अफझलखान कपटी, पाताळयंत्री, विजय मिळावा यासाठी कोणत्याही थराला जाणारा, धर्मवेडा, क्रूर, पराक्रमी परंतु तितकाच गर्वीष्ट होता. औरंगजेबसुद्धा ज्याच्यासमोर हरला होता त्याला शिवाजीराजांनी संयम आणि शौर्याच्या बळावर यमसदनाला पाठवले.

मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब : 24 ऑक्टोबर 1618 ते 20 फेब्रुवारी 1707

मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब याने भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्षं राज्य केलं. पण, राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी स्वतःचा भाऊ दारा शुकोहचा खून करणारा आणि वृद्ध पित्याला अखेरच्या काळात आग्र्याच्या किल्ल्यात कैदी बनवून ठेवणारा आलमगीर भारतीयांच्या मनात कधीही आपली जागा निर्माण करू शकला नाही. म्हणूनच की काय औरंगजेबाचं दफन महाराष्ट्रातील खुल्ताबादमध्ये एका कच्च्या कबरीत झालं. तर, त्या उलट हुमायून यांचं दफन दिल्लीत लाल दगडांच्या भव्य मकबर्‍यात आणि शाहजहॉं याच दफन आग्र्यात अति भव्य शुभ्र ताजमहालमध्ये झालं.

3 नोव्हेंबर 1618 रोजी दोहादमध्ये औरंगजेब याचा जन्म झाला. शाहजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा. त्याचे संपूर्ण नाव ‘अबुल मुझफ्फर मुई-उद-दिन मुहंमद’. इस्लामिक धार्मिक साहित्य आणि तुर्की साहित्यात त्याला रुची होती. कुराण आणि हदीस यांचा त्याने अभ्यास केला. त्याला उत्तम हिंदी बोलता येत होतं. तसेच अरबी, चघताई, फार्सी आणि तुर्की भाषाही त्याने आत्मसात केल्या होत्या. सत्तेच्या लालसेपोटी त्याने आपल्या तिन्ही भावांना ठार मारले. तर, वडील शाहजहानला आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. त्याचा फार मोठा फटका औरंगजेबाला बसला. मक्केच्या शरीफांनी त्याला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नकार दिला. पुढे अनेक वर्षं त्याने पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या. औरंगझेब आणि आलमगीर या दोन पदव्या त्याने धारण केल्या होत्या. औरंगझेब म्हणजे सिंहासनाची किंवा गादीची शोभा (वाढविणारा) आणि आलमगीर म्हणजे जगाचा राजा किंवा जगावर राज्य करणारा.

औरंगजेब याने लष्करी कौशल्य दाखवून बुंदेल्यांचे बंड मोडले. त्यामुळे शाहजहानने त्याला दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठविले. औरंगजेब 1636 ते 1644 दक्षिणेचा, 1645 ते 1648 गुजरातचा, 1648 ते 1652 मुलतानचा आणि शेवटी 1652 ते 1657 पुन्हा दक्षिणेचा सुभेदार होता. शहाजीराजे यांचा पराभव करून त्याने अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट केला. 1657 मध्ये त्याने दौलताबादपासून जवळच खडकी येथे औरंगाबाद शहर वसविले. जून 1659 मध्ये त्याचे राज्यारोहण झाले आणि त्याने आलमगीर पदवी धारण केली.

औरंगजेबाचे पंजाचे विशेष फर्मान

aurangjeb 1

औरंगजेब यांच्या पंजाचे ठसे उमटविलेले फर्मान हे शाही फर्मान मानले जायचे. उगाळलेल्या चंदनी गंधात हात बुडवून बादशहा ज्या फर्मानावर आपला पंजा उमटवी ते फर्मान बादशहाच्या विशेष कृपेचे द्योतक समजले जात असे. अशा फर्मानाचा स्वीकार करण्याची एका खास पध्दत होती. शाही फर्मानाचे स्वागत करण्यासाठी हजारो रुपये खर्च करुन स्वतंत्र मंडप उभारला जात असे. त्याला फर्मानबाडी उभारणे म्हणत.

फर्मान घेऊन आलेले सांडणीस्वार तीन – चार कोसांवरील फर्मानबाडीत येऊन थांबत. ज्यांच्या नावे फर्मान आले असेल त्याने लवाजमा घेऊन तीन – चार कोस अनवाणी पायी चालत फर्मानास सामोरे जायचे. फर्मान घेऊन येणारा सांडणीस्वार ज्याला गुर्झबदार म्हणत. तो फर्मान घेऊन फर्मानबाडीत उभा राही. फर्मान स्वीकार करणार्‍याने आपले गुडघे जमिनीवर टेकून नम्रपणे ते ओंजळीत घ्यायचे. स्वत:च्या मस्तकी फर्मान धरून बंदुकांच्या सलाम्या आणि रणवाद्यांचा गजर करीत पुन्हा तीन चार कोस चालत जाऊन त्या स्थितीतच स्व मुक्कामी पोहोचायचे अशी ही शाही फर्मान स्वीकारण्याची खास पद्धत होती.

औरंगजेबाच्या कारकीर्दीचे दोन भाग

1658 ते 1681 पर्यंत उत्तर हिंदुस्थानात आणि 1681 ते 1707 पर्यंत दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध लढाई असे औरंगजेबाच्या कारकीर्दीचे दोन भाग आहेत. उत्तरेत साम्राज्य विस्तारासाठी त्याने पूर्व आणि वायव्य सरहद्दींवर चढाईचे धोरण स्वीकारले. वायव्य सरहद्दीवर युसुफ आणि अकमल खान याच्या नेतृत्वाखालील अफगाण यांनी केलेले उठाव औरंगजेबाने मोडीत काढले. या लढायांत तो स्वत: आघाडीवर होता. पण या मोहिमेत त्याचे मोठे आर्थिक आणि राजकीय नुकसान झाले. दक्षिणेतील कुशल अधिकारी या आघाडीवर गुंतल्यामुळे दक्षिणेमध्ये शिवाजी राजांना राज्यविस्तार करता आला.

शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचे संबंध 1657 पासून बिघडले होते. शिवाजी महाराज यांनी मुघलांचे किल्ले ताब्यात घेऊन औरंगजेब याला मोठा शह दिला होता. अफगाण, जाट, रजपूत, शीख, सतनामी. छत्रसाल बुंदेला अशा शत्रूंची बंडे औरंगजेबाने मोडली. पण, शिवाजी महाराज यांच्यासमोर त्याला सतत पराभव स्वीकारावा लागला. औरंगजेबाने शिवाजी महाराज यांचे स्वराज्य मोडून काढण्यासाठी शायिस्तेखान, मुअज्जम, जयसिंग, दिलेरखान, महाबतखान असे मातबर सरदार दक्षिणेत धाडले. पण, कधी मुसद्दीपणा तर कधी चातुर्यपणाला लावत महाराजांनी त्या सरदारांवर मात केली होती.

शिवाजी महाराज – औरंगजेब यांची पहिली भेट

राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पुरंदरला वेढा घातला होता. या वेढ्यामुळे शिवाजी महाराज यांना माघार घेऊन तह करावा लागला. त्या तहानुसार शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस जावे लागले. औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त सभारंभात शिवाजीराजे यांचा अपमान करण्यात आला. महाराज महाल सोडून निघाले. संधी फायदा घेत राजांना नजरकैद केले गेले. महाराजांनी मोठ्या चातुर्याने त्यातून आपली सुटका करून घेतली. स्वराज्यात पुन्हा परत येताच महाराजांनी आपले राज्यविस्ताराचे काम पुन्हा जोमाने हाती घेतले. शिवाजी महाराज हयात असेपर्यंत औरंगजेबाला मराठ्यांचे राज्य बुडविता आले नाही.

औरंगजेब दक्षिणेत येईपर्यंत 24 वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अनेक किरकोळ बंडे मोडली. पण, दक्षिणेत मराठ्यांशी युद्ध होण्यास एक महत्वाचे कारण होते. औरंगजेबाचा धाकटा मुलगा सुलतान अकबर याने बापाविरुद्ध बंड केले. स्वत:ला बादशाह जाहीर केले. बापापासून संरक्षण मिळण्यासाठी अकबर याने राजपुतांची मदत घेतली. मुघल त्याचा पाठीवर होतेच. त्यांचा पाठलाग चुकविण्यासाठी राजपूत सरदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आश्रयास आले. मात्र. यामुळे मराठ्यांचा नाश करण्याची आयती संधी औरंगजेबाला मिळाली.

मराठ्यांनी झुंजवत ठेवले

औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली त्याची सर्व मुले, नातू, सरदार यांनी मराठी राज्यावर आक्रमण सुरू केले. संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कडवट विरोध केला. पण, चार वर्षे ल्दः देऊनही यश न मिळाल्याने त्याने आपला मोर्चा शिया पंथाचा पुरस्कार करणार्‍या आणि संभाजीस साह्य करणार्‍या विजापूर, गोवळकोंडे येथील शाही सत्ता नष्ट करण्याकडे वळविला. 1686 मध्ये विजापूरच्या सिकंदर आदिलशाहाचा आणि 1687 मध्ये गोवळकोंड्याच्या कुत्बशाहाचा पराभव केल्यानंतर त्याने पुन्हा आपला मोर्चा मराठ्यांकडे वळविला.

मुकर्रबखान नावाच्या सरदाराला काही मराठे सरदार फितूर झाले होते. त्यामुळेच त्याला संभाजी राजे कैद करता आले. औरंगजेब याने संभाजीराजे यांना धर्मांतर करण्याची जबरदस्ती केली. पण, त्यांनी त्यास नकार दिल्याने औरंगजेब याने संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारले. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर आठ वर्षे मराठ्यांनी मोगलांना झुंजवत ठेवले. अखेर, वयाच्या 89 व्या वर्षी अहमदनगर जवळ भिंगार येथे त्याचा मृत्यू झाला.

औरंगजेबाचे व्यक्तिमत्व

औरंगजेब शांत होता. गरजेचे तितकेच तो बोलत असे, अनेकदा तो गंभीर असे. नात्यांबद्दल त्याला आत्मीयता, प्रेम, विश्वास काहीच नव्हते पण तो धार्मिक होता. नमाज, रोजा, जकवा (दानधर्म), हजयात्रा आणि कुराणपठण हे पाच नियम नेमाने करत असे. परंतु, कपटीपणा, हत्या, लबाडी त्याच्या ठायी ठायी भरल्या होत्या. त्याने स्वतः कुराणच्या 2 प्रति लिहून मक्का आणि मदिना येथे नजर केल्या होत्या. औरंगजेब याने 4 विवाह केले. पहिली पत्नी होती दिलरसबानू बेगम हिच्यापासून झेबुन्निसा, जिनत उन्निसा, जुबेदत उन्निसा, आजम, अकबर ही पाच अपत्ये झाली. दुसरी नवाबबाई हिच्यापासून महंमद सुलतान, मुअज्जम, बद्रुन्निसा अशी तीन अपत्ये, तिसरी औरंगाबादी महल हिच्यापासून मेहर उन्निसा ही मुलगी तर चौथी पत्नी उदेपूर बेगम हिच्यापासून कामबक्ष अशी एकूण 9 अपत्ये होती.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.