पाऊस LIVE : बुलडाण्यात नदीला पूर, औरंगाबादेत धबधबा कोसळू लागला

| Updated on: Jun 24, 2019 | 10:30 AM

मराठावाडा, विदर्भात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात पाऊस सर्वदूर कोसळतआहे.

पाऊस LIVE : बुलडाण्यात नदीला पूर, औरंगाबादेत धबधबा कोसळू लागला
Follow us on

मुंबई :  मराठावाडा, विदर्भात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाला. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.  बुलडाण्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब झाले आहेत. इतकंच नाही तर पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने बुलडाणा- धाड रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.

बुलडाण्यात मुसळधार

बुलडाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु असून नदी नाल्यांची पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील कोलवड गावाजवळ असलेली पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसाने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बुलडाणा – अजिंठा राज्य महामार्गावर बांधकाम सुरु असलेला पूल वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी सोयाबीनची पेरणी झाली आहे. शिरपूर परिसरात हळदीच्या लागवडीला सुरुवात झाली. मात्र जमिनीत पाऊस मुरल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मराठवाड्यात जोरदार पाऊस

औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. गेल्या चोवीस तासापासून मराठवाड्यात दमदार पाऊस होत आहे. दमदार पावसाने मराठवाड्यात नदी नाल्यांसाह जलसंधारणाच्या कामं झालेल्या ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत मान्सूनने मराठवाड्यात सर्वदूर हजेरी लावल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकरीराजा सुखावला असून पेरणीची लगबग सुरु आहे.

निम्मा महाराष्ट्र व्यापला

मान्सूनने महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. पावसाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे.  कोकणात मात्र मान्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे.  येत्या 48 तासांत मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सोलापूर

महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली असताना सोलापुरातही रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. रात्री आकराच्या सुमारास जोरदार पावसाने शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावली. तर पहाटेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. गेल्या महिनाभरापासून शेतकरीराजा चातकाप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षेत होता. एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे मान्सून लांबणीवर पडल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धाकधूक कमी झाली आहे.

नंदुरबार

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाची चिंता दूर झाली आहे. शेती कामांना वेग आला आहे.

मुंबईत रिमझिम

राज्यात जून महिन्यात जेवढा पाऊस होतो तेवढा पाऊस यंदा झालेला नाही. येत्या दोन दिवसात मुंबईत मान्सूनच्या सरी बरसतील असा अंदाज आहे. आज सकाळपासून मुंबईत रिमझिम पाऊस सुरू आहे. तर मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.