‘राजकारण संपलं, आता गोकुळच्या दुधाला येणार सोन्याचा भाव…’ हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
निवडणुकीत त्यांचे 13 आणि आमचे 12 संचालक निवडून आले होते. त्यामुळे कोणालाही एकट्याने कोरम पूर्ण करणे शक्य नव्हते, ही एक वैधानिक अडचण होती. ती दूर करण्याचे काम राज्य सरकारने केले," असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif On Gokul Election 2026: गोकुळ दूध संघ निवडणुकीतील राजकारण आता संपले आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असून आता दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादन आणि संकलन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असल्याचे स्पष्ट केले. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुनही महत्त्वाचे विधान केले.
काय म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ?
“कोल्हापूर वगळता राज्यात इतर कुठेही मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध होत नाही. मुंबई आणि पुण्यात आता गोकुळच्या दुधाला सोन्याचा भाव येणार आहे. गोकुळ दूध संघातील राजकारण आता संपले असून, नवनिर्वाचित अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे. निवडणुकीत त्यांचे 13 आणि आमचे 12 संचालक निवडून आले होते. त्यामुळे कोणालाही एकट्याने कोरम पूर्ण करणे शक्य नव्हते, ही एक वैधानिक अडचण होती. ती दूर करण्याचे काम राज्य सरकारने केले,” असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “महाराष्ट्र हे देशातील मुक्त राज्य आहे. येथे कोणालाही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट हे दोन पक्ष कोण चालवत आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. संजय राऊत यांनी इतर पक्षांवर बोलण्यापेक्षा आधी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी. त्यांच्या पक्षाचे किती खासदार आणि आमदार निवडून आले होते आणि आता किती शिल्लक आहेत, याकडे त्यांनी लक्ष द्यावे. स्वतःच्या पक्षातील परिस्थितीवर भाष्य न करता संजय राऊत प्रत्येक विषयात नाक खुपसून बोलत असतात,” असा टोला यावेळी हसन मुश्रीफ यांनी लगावला.
दरम्यान, यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवरुनही महत्त्वाचे विधान केले. “रोहित पवार हे महान नेते आहेत, त्यांनी कुठलातरी शोध लावला होता ते मागच्या दहा तारखेलाच काहीतरी स्पष्ट करणार होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समोर आता त्यांनी मफलर लटकवला आहे, सोळा तारखे नंतर ते काय म्हणता त्यानंतर आपण याबाबत बोलू,” असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.